भारत दरवर्षी ७०० टनांहून अधिक सोन्याची आयात का करतो?

भारत दरवर्षी ७०० टनांहून अधिक सोन्याची आयात का करतो?

भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि संस्कृतीत सोन्याला अद्वितीय स्थान आहे. भारतात सोनं हे पिढ्यानपिढ्या वारसा म्हणून दिले जाते याशिवाय सणासुदीला भेट म्हणूनही मोठ्या प्रमाणात दिले जाते आणि अनेकदा एक मौल्यवान व्यावहारिक मालमत्ता म्हणूनही सोन्याकडे पहिले जाते. म्हणूनच भारताची सोन्याच्या आयातीची कहाणी केवळ चैनीच्या वस्तूंपुरती मर्यादित नाही; तर ती कौटुंबिक बचती आणि खरेदीच्या सवयींशी देखील जोडलेली आहे.

दरवर्षी भारत ७०० टनांहून अधिक सोने आयात करतो, कारण देशांतर्गत मागणी स्थानिक पुरवठ्यापेक्षा खूप जास्त असते. भारतात काही प्रमाणात सोन्याचे उत्खनन होते, परंतु दागिने, गुंतवणुकीसाठीची नाणी आणि हंगामी खरेदी यांसारख्या वापराच्या प्रमाणाची पूर्तता करण्यासाठी ते पुरेसे नाही. त्यामुळे जेव्हा मागणी वाढते, तेव्हा आयात नैसर्गिकरित्या ही तूट भरून काढते.

मागणी मजबूत का राहते?

या भरीव मागणीचे एक कारण म्हणजे या धातूशी निगडित भावनिक पैलू. भारतात सोने हे लग्न, जन्म, वाढदिवस आणि सण-उत्सव यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांशी घट्टपणे जोडलेले आहे. दुसरे कारण आर्थिक आहे, कारण अनेक कुटुंबे आजही सोन्याला एक मूर्त मालमत्ता मानतात. यामुळेच किमतीतील चढउतार असूनही भारतातील सोन्याची आयात संरचनात्मकदृष्ट्या उच्च राहते. जेव्हा किमती कमी होतात, तेव्हा लोकांना संधी दिसल्यामुळे खरेदी अनेकदा वाढते. जेव्हा किमती वाढतात, तेव्हा मागणी थोड्या काळासाठी कमी होऊ शकते, पण ती क्वचितच पूर्णपणे नाहीशी होते. खरेदीदार फक्त प्रमाण, डिझाइनची निवड किंवा वेळ यामध्ये बदल करतात.

भारताच्या व्यापक आयात- निर्यात आकडेवारीमध्येही हाच नमुना दिसून येतो. सोने अनेकदा देशाच्या प्रमुख आयात वस्तूंपैकी एक राहते, कारण ते उपभोग, बचत आणि सांस्कृतिक सातत्य यांच्या संगमावर आहे.

किंमती आणि धोरणाची भूमिका

भारतातील सोन्याच्या आयातीबद्दलची कोणतीही चर्चा किंमतींचा विचार केल्याशिवाय पूर्ण होत नाही. दागिन्यांची किरकोळ किंमत अनेक बदलत्या घटकांवर अवलंबून असते. जसे की, आंतरराष्ट्रीय सराफा किंमत, रुपया- डॉलर समीकरण, स्थानिक कर आणि सराफांच्या स्तरावरील शुल्क. म्हणूनच ग्राहक दररोज पाहत असलेला सोन्याचा दर हा केवळ बाजारातील भावनांपेक्षाही अधिक गोष्टींशी निगडित असतो.

धोरण देखील महत्त्वाची भूमिका बजावते. सोन्यावरील आयात शुल्काचा परिणाम अंतिम किमतीवर होतो आणि अगदी लहान बदलांमुळेही खरेदीच्या पद्धतींमध्ये बदल होऊ शकतो. तरीही, भारतासारख्या बाजारपेठेत वाढलेल्या किमतींमुळे मागणी आपोआप कमी होत नाही. उलट, त्यामुळे अनेकदा लोकांच्या खरेदी करण्याच्या पद्धतीत बदल होतो.

विनिमय अधिक महत्त्वाचा का होत आहे?

पूर्णपणे नवीन खरेदी करण्याऐवजी, अनेक खरेदीदार सोन्याच्या विनिमयाकडे वळत आहेत. लॉकरमध्ये न वापरलेले जुने दागिने आता एक असे मूल्य म्हणून पाहिले जात आहेत, ज्याचा उपयोग होऊ शकतो. बदलत्या आवडीनिवडी सांभाळत बजेट सांभाळू पाहणाऱ्या कुटुंबांसाठी, विनिमय व्यावहारिक वाटतो. यामागील तर्क सोपा आहे. जर एखाद्या कुटुंबाकडे आधीपासूनच जुन्या बांगड्या, साखळ्या किंवा वडिलोपार्जित दागिने असतील जे आता त्यांच्या आवडीनिवडींशी जुळत नाहीत, तर त्यांची अदलाबदल केल्याने नवीन वस्तू खरेदी करण्याचा खर्च कमी होतो. वाढत्या किमतींच्या वातावरणात, हा फायदा अधिक महत्त्वाचा ठरतो.

व्यापक स्तरावर, यामुळे देशांतर्गत सोने पुन्हा चलनात येण्यास मदत होते, नव्याने आयात केलेल्या सोन्यावरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होते आणि भारताच्या अधिक कार्यक्षम सुवर्ण अर्थव्यवस्थेला पाठिंबा मिळतो. असंघटित बाजारपेठेतील छुपी कपात, शुद्धतेसंबंधीचे अनपेक्षित बदल आणि अस्पष्ट मूल्यांकन पद्धतींबद्दल ग्राहक अधिक जागरूक होत असल्याने हा कल अधिकच दृढ झाला आहे.

Exit mobile version