जिओथर्मल प्रकल्प: लडाखच्या भूगर्भातून होणार वीजेचा जन्म!

जिओथर्मल प्रकल्प: लडाखच्या भूगर्भातून होणार वीजेचा जन्म!

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखचा विचार केला, की डोळ्यांसमोर उभं राहतं ते बर्फाच्छादित पर्वतांचं अथांग साम्राज्य… शेकडो किलोमीटरपर्यंत पसरलेले डोंगर… विरळ हवा… आणि निसर्गाच्या भव्यतेसमोर माणूस किती छोटा आहे याची जाणीव करून देणारा परिसर. पण या शांत, गोठलेल्या भूमीखाली एक वेगळंच विश्व दडलं आहे. वरच्या पृष्ठभागावर थंडीचा अंमल असताना, जमिनीच्या खोल गर्भात मात्र प्रचंड उष्णता सतत धगधगत असते. लाखो वर्षांपासून सुरू असलेल्या या नैसर्गिक प्रक्रियेत एवढी क्षमता दडलेली आहे की, ती संपूर्ण शहरांना ऊर्जा पुरवू शकते.

आता ऊर्जेचा विचार केला, की आपल्या मनात कोळशाच्या खाणी, धरणं, सौर पॅनेल्स किंवा वाऱ्यावर फिरणाऱ्या टर्बाइन्सची चित्रं उभी राहतात. पण पृथ्वीच्या गर्भात साठलेल्या या अदृश्य शक्तीकडे आपण क्वचितच पाहतो. जगातील काही देशांनी मात्र याच शक्तीच्या आधारावर आपली वीजव्यवस्था उभी केली आहे.

कल्पना करा… बाहेर तापमान उणे वीस अंशांवर पोहोचलेलं आहे. बर्फाने झाकलेला परिसर शांत आहे. पण काही किलोमीटर जमिनीखाली खडक तापलेले आहेत, पाणी उकळत आहे आणि पृथ्वीच्या अंतरंगातून उष्णतेचे प्रवाह वरच्या दिशेने सरकत आहेत. जणू निसर्गाने स्वतःच उभारलेला एक अदृश्य ऊर्जा प्रकल्प. आता भारत या शक्तीला प्रत्यक्ष ऊर्जेत रूपांतरित करण्याच्या तयारीत आहे. लडाखमध्ये आकार घेत असलेला भारताचा पहिला जिओथर्मल पॉवर प्लांट हा केवळ एक प्रकल्प नसून, देशाच्या ऊर्जा इतिहासातील एका नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकतो.

आज जग स्वच्छ, शाश्वत आणि विश्वासार्ह ऊर्जास्रोतांच्या शोधात आहे. कोळसा प्रदूषण वाढवतो, तेल आणि वायू आयातीवर अवलंबून असतात, तर सौर आणि पवन ऊर्जा हवामानावर अवलंबून असतात. अशा वेळी पृथ्वीच्या गर्भात दडलेली ही ऊर्जा नव्या शक्यतांचे दार उघडताना दिसत आहे. म्हणूनच ही केवळ एका प्रकल्पाची कथा नाही. ही भारताच्या तांत्रिक क्षमतेची कसोटी आहे. ही आत्मनिर्भरतेकडे टाकलेली आणखी एक पायरी आहे. पण लडाखच का? पृथ्वीच्या गर्भातील ही उष्णता वीजेमध्ये कशी रूपांतरित केली जाते? आणि भारतासाठी या तंत्रज्ञानाचं महत्त्व काय आहे?

जिओथर्मल पॉवर म्हणजे काय?

आपण वीज निर्मितीसाठी निसर्गातील विविध शक्तींचा वापर करतो. सूर्यप्रकाशापासून सौरऊर्जा मिळते, वाऱ्यापासून पवनऊर्जा मिळते, तर वाहत्या पाण्यापासून जलविद्युत निर्माण केली जाते. मात्र जिओथर्मल ऊर्जा इतरांपेक्षा वेगळी आहे, कारण तिचा स्रोत पृथ्वीच्या अंतरंगात दडलेला असतो. “जिओ” म्हणजे पृथ्वी आणि “थर्मल” म्हणजे उष्णता. पृथ्वीच्या आत साठलेल्या नैसर्गिक उष्णतेचा वापर करून वीज निर्माण करण्याच्या प्रक्रियेला जिओथर्मल ऊर्जा म्हणतात.

जमिनीच्या खोल भागात तापलेले खडक आणि उष्ण जलसाठे असतात. विशेष विहिरींच्या मदतीने हे पाणी किंवा त्यातून निर्माण झालेली वाफ पृष्ठभागावर आणली जाते. त्यानंतर त्या वाफेच्या साहाय्याने टर्बाइन फिरवून वीज निर्माण केली जाते. या ऊर्जेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती दिवस-रात्र आणि कोणत्याही ऋतूमध्ये सातत्याने उपलब्ध राहू शकते. मात्र अशी सुविधा कुठेही उभारता येत नाही. त्यासाठी जमिनीखाली पुरेशी उष्णता, योग्य जलसाठे आणि विशिष्ट भूगर्भीय परिस्थिती असणं आवश्यक असतं.

पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो… भारतात जिओथर्मल ऊर्जेची क्षमता असलेली इतरही अनेक ठिकाणं असताना, पहिल्या जिओथर्मल प्रकल्पासाठी पोगा व्हॅलीचीच निवड का करण्यात आली? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला लडाखच्या बर्फाच्छादित पर्वतांकडे नव्हे, तर पृथ्वीच्या हजारो फूट खोल अंतरंगात डोकवावं लागेल. कारण पोगा व्हॅलीची खरी ओळख तिच्या पृष्ठभागावर नाही, तर तिच्या पायाखाली दडलेल्या भूगर्भीय शक्तींमध्ये आहे.

लडाखच्या चांगथांग प्रदेशात समुद्रसपाटीपासून सुमारे १४ हजार फूट उंचीवर वसलेली पोगा व्हॅली ही हिमालयाच्या निर्मितीशी जोडलेल्या भूगर्भीय प्रक्रियांचा जिवंत पुरावा मानली जाते. लाखो वर्षांपूर्वी भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या धडकेतून निर्माण झालेल्या भूगर्भीय हालचालींचा प्रभाव आजही या भागात दिसून येतो. त्यामुळे येथे गरम पाण्याचे झरे, सल्फरचे साठे आणि भूऔष्णिक क्रियाशीलतेची इतर अनेक चिन्हे आढळतात. १९७० आणि ८० च्या दशकातील सर्वेक्षणांपासूनच या वैशिष्ट्यांनी वैज्ञानिकांचे लक्ष वेधून घेतले.

भारतात सुमारे ३५० भूऔष्णिक स्थळांची नोंद असली, तरी पुढील अनेक दशकांच्या अभ्यासातून पोगा परिसरातील ऊर्जा क्षमता अधिक स्पष्ट होत गेली. भारतीय भूवैज्ञानिक संस्था, विविध संशोधन संस्था आणि ONGC यांनी येथे सविस्तर संशोधन आणि चाचण्या केल्या. या निष्कर्षांच्या आधारावरच पुढे भारताच्या पहिल्या जिओथर्मल प्रकल्पासाठी पोगा व्हॅलीची निवड करण्यात आली.

पण क्षमता ओळखणं आणि प्रत्यक्ष वीज प्रकल्प उभारणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्या काळात भारताचं लक्ष प्रामुख्याने कोळसा, जलविद्युत आणि नंतर सौर व पवन ऊर्जेच्या विस्तारावर केंद्रित होतं. जिओथर्मल तंत्रज्ञानासाठी लागणारी प्रगत ड्रिलिंग, मोठी गुंतवणूक आणि उच्च तांत्रिक कौशल्य यांमुळे हा विषय संशोधनाच्या चौकटीतच राहिला.

मात्र गेल्या दशकात परिस्थिती वेगाने बदलू लागली. हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांमुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्याची गरज अधिक तीव्र झाली. सौर आणि पवन ऊर्जेसोबतच चोवीस तास उपलब्ध राहू शकणाऱ्या स्वच्छ ऊर्जास्रोतांकडेही जगाचं लक्ष वळू लागलं. अशा वेळी जिओथर्मल ऊर्जेच्या शक्यता नव्याने तपासल्या जाऊ लागल्या. याच पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये लडाख प्रशासन, लेह हिल डेव्हलपमेंट कौन्सिल आणि ONGC यांनी पोगा व्हॅलीमध्ये भारताचा पहिला जिओथर्मल फील्ड डेव्हलपमेंट प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ड्रिलिंग मोहिमा सुरू झाल्या आणि अलीकडील चाचण्यांमधून मिळालेल्या उत्साहवर्धक निष्कर्षांमुळे या प्रकल्पाला नवी गती मिळाली. पृथ्वीच्या गर्भातील उष्णतेचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करण्याच्या दिशेने भारत टाकत असलेलं हे पहिलं मोठं पाऊल आहे. त्यामुळे पोगा व्हॅलीतील हा उपक्रम केवळ एका प्रकल्पापुरता मर्यादित राहत नाही, तर भारताच्या ऊर्जा क्षेत्रात नव्या शक्यतांचे दार उघडतो.
मात्र कोणत्याही ऊर्जा प्रकल्पाचं यश केवळ संसाधनांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसतं; त्या संसाधनांचा वापर करण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानावरही ते तितकंच अवलंबून असतं. त्यामुळे आता या प्रकल्पाची रचना, क्षमता आणि कार्यपद्धती समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

जिओथर्मल ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याची कल्पना जितकी आकर्षक वाटते, तितकीच तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी आव्हानात्मक आहे. विशेषतः लडाखसारख्या प्रदेशात, जिथे समुद्रसपाटीपासूनची उंची १४ हजार फूटांपेक्षा अधिक आहे, हिवाळ्यात तापमान उणे अंशांपर्यंत घसरतं आणि प्रत्येक बांधकाम निसर्गाशी संघर्ष करत उभं राहावं लागतं. याच कठीण परिस्थितीत ONGC Energy Centre भारताच्या पहिल्या जिओथर्मल उपक्रमाचा पाया रचत आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे भूगर्भातील उष्णतेची क्षमता आणि स्वरूप यांचं अचूक मूल्यांकन. त्यासाठी अत्याधुनिक ड्रिलिंग रिगच्या सहाय्याने खोल विहिरी खोदल्या जात आहेत. या प्रक्रियेत भूगर्भातील तापमान, दाब, गरम पाण्याचे साठे आणि वाफेची उपलब्धता यांचा सखोल अभ्यास केला जात आहे.

या मोहिमेत पोगा परिसरात सुमारे ४०५ मीटर खोलीपर्यंत यशस्वी ड्रिलिंग करण्यात आलं. लडाखमधील जिओथर्मल क्षेत्रातील हे आतापर्यंतचं सर्वात खोल ड्रिलिंग मानलं जातं. विशेष म्हणजे, या चाचण्यांमधून २०० ते २४० अंश सेल्सिअस तापमानाचे संकेत मिळाले आहेत. जिओथर्मल क्षेत्रात हे अत्यंत आशादायक मानलं जातं, कारण अशा तापमानाच्या आधारे प्रभावी आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य वीज निर्मिती शक्य होते.

या निष्कर्षांच्या आधारे पहिल्या टप्प्यात सुमारे १ मेगावॅट क्षमतेचा पायलट पॉवर प्लांट उभारण्याची योजना आहे क्षमतेच्या दृष्टीने हा प्लांट लहान वाटू शकतो, पण त्याचं महत्त्व मेगावॅटमध्ये नव्हे तर तांत्रिक पडताळणीत आहे. कारण या पायलट प्लांटमुळे पोगा व्हॅलीतील जिओथर्मल साठेदीर्घकाळ टिकाऊ आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आहेत का, याची प्रत्यक्ष चाचणी घेणार आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जमिनीखालून वर आणले जाणारे अतितप्त पाणी किंवा वाफ टर्बाइन फिरवेल आणि त्यातून वीज निर्माण होईल. त्यानंतर हे पाणी पुन्हा जमिनीखाली सोडलं जाईल. त्यामुळे नैसर्गिक साठ्यावरचा ताण कमी राहील आणि ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया अधिक शाश्वत बनेल.

या प्रकल्पाचं महत्त्व केवळ वीज निर्मितीपुरतं मर्यादित नाही. भविष्यात त्याचे परिणाम लडाखच्या विकासापासून भारताच्या ऊर्जा धोरणापर्यंत अनेक स्तरांवर दिसू शकतात. मात्र अशा शक्यता कितपत वास्तववादी आहेत, हे समजून घेण्यासाठी जगातील इतर देशांचा अनुभव पाहणं महत्त्वाचं ठरतं.

जगातील अनुभव पाहिला, तर जिओथर्मल ऊर्जा भारतासाठी नवी असली, तरी काही देशांनी तिचा यशस्वी वापर अनेक दशकांपूर्वीच सुरू केला आहे. आज जिओथर्मल ऊर्जेचा विचार केला, तर सर्वात पहिलं नाव घेतलं जातं ते अमेरिकेचं. जगातील सर्वाधिक जिओथर्मल वीज क्षमता आज अमेरिकेकडे आहे. तिच्या पाठोपाठ इंडोनेशिया, फिलिपिन्स, तुर्की, न्यूझीलंड आणि केनिया यांसारख्या देशांनीही या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आपल्या ऊर्जा व्यवस्थेत महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे.

या यादीतील प्रत्येक देशाचा अनुभव वेगळा असला, तरी केनियाची कहाणी विशेष लक्षवेधी मानली जाते. आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅली परिसरातील भूगर्भीय वैशिष्ट्यांचा लाभ घेत या देशाने आपल्या वीज उत्पादनाचा मोठा हिस्सा जिओथर्मल स्रोतांमधून मिळवण्यास सुरुवात केली. परिणामी आयातीत इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यात त्यांना मोठं यश मिळालं.

मात्र जिओथर्मल ऊर्जेची खरी ताकद पाहायची असेल, तर नजर वळते ती आइसलँडकडे. ज्वालामुखींच्या भूमी म्हणून ओळखला जाणारा हा देश जिओथर्मल ऊर्जेचा वापर केवळ वीज निर्मितीसाठीच करत नाही, तर दैनंदिन जीवनाचाच भाग म्हणून करतो. आइसलँडचा अनुभव दाखवून देतो की, योग्य भूगर्भीय परिस्थिती आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास जिओथर्मल ऊर्जा एखाद्या देशाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनू शकते. त्यामुळे पोगा व्हॅलीतील हा प्रयोग यशस्वी ठरल्यास, भारतातील जिओथर्मल ऊर्जेच्या व्यापक विस्ताराचा पाया इथेच रचला जाऊ शकतो.

मात्र, या प्रकल्पाचे परिणाम ऊर्जा क्षेत्राच्या पलीकडे जाऊन लडाखच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना देऊ शकतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे ऊर्जा सुरक्षेचा. आज लडाखमधील अनेक दुर्गम भाग अजूनही डिझेल-आधारित ऊर्जा व्यवस्थेवर अवलंबून आहेत. कठोर हिवाळा आणि वाहतुकीच्या मर्यादा लक्षात घेतल्या, तर हा खर्चिक आणि आव्हानात्मक पर्याय ठरतो. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेला आणि वर्षभर अखंड कार्यरत राहणारा जिओथर्मल ऊर्जास्रोत लडाखच्या ऊर्जा व्यवस्थेला अधिक स्थैर्य देऊ शकतो.

यासोबतच हा उपक्रम रोजगार आणि कौशल्यविकासासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. ड्रिलिंग, अभियांत्रिकी, देखभाल, भूगर्भीय संशोधन आणि तांत्रिक सेवांसारख्या क्षेत्रांमध्ये परिसरातील युवकांसाठी नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. दीर्घकालीन दृष्टीने पाहिल्यास, जिओथर्मल ऊर्जेभोवती एक स्वतंत्र औद्योगिक परिसंस्थाही येथे आकार घेऊ शकते.

जिओथर्मल ऊर्जेचा वापर वीज निर्मितीबरोबरच अनेक पूरक क्षेत्रांमध्येही करता येऊ शकतो. घरांच्या हीटिंग सिस्टीमपासून ग्रीनहाऊस शेतीपर्यंत आणि पर्यटन सुविधांपासून लघुउद्योगांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे अत्यंत थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या लडाखमध्ये वर्षभर शेतीच्या नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात, पर्यटन क्षेत्राला चालना मिळू शकते आणि अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांना नवं बळ मिळू शकतं.

त्याहून महत्त्वाचं म्हणजे, पोगा प्रकल्प भारताच्या जिओथर्मल क्षमतेची पहिली मोठी कसोटी मानला जात आहे. या उपक्रमाला यश मिळाल्यास हिमालयीन पट्टा, खंभात बेसिन, अंदमान-निकोबार आणि इतर भूऔष्णिक क्षेत्रांमध्ये अशाच प्रकल्पांच्या उभारणीला चालना मिळू शकते. अशा अर्थाने पाहिल्यास, पोगा व्हॅलीतील हा उपक्रम भविष्यात भारतातील जिओथर्मल ऊर्जाविकासाचा दिशादर्शक ठरू शकतो.

ऊर्जा सुरक्षा, स्वच्छ वीज निर्मिती आणि शाश्वत विकासाच्या शोधात असलेल्या भारतासाठी पोगा व्हॅलीचं महत्त्व याच ठिकाणी अधोरेखित होतं. लडाखच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेलं हे ड्रिलिंग केवळ जमिनीच्या खोल थरांचा वेध घेत नाही, तर भविष्यातील ऊर्जास्रोतांच्या नव्या शक्यतांचाही शोध घेत आहे. पोगा प्रकल्प यशस्वी ठरल्यास भारतातील इतर भूऔष्णिक क्षेत्रांच्या विकासालाही नवी दिशा मिळू शकते. त्यामुळे पोगा व्हॅलीची ही कहाणी एका प्रकल्पापुरती मर्यादित राहत नाही; ती भारताच्या ऊर्जा इतिहासातील नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकते.

Exit mobile version