सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी

१० ग्रॅम सोन्याचा भाव १.६२ लाखांच्या पार

सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी

देशातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा विक्रमी पातळी गाठली असून सर्वसामान्य ग्राहकांसह गुंतवणूकदारांचे लक्ष आता मौल्यवान धातूंकडे लागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, मध्यपूर्वेतील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किंमतीतील वाढ आणि केंद्र सरकारने वाढवलेले आयात शुल्क यामुळे सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे.

आजच्या बाजारभावानुसार २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे सुमारे १ लाख ६२ हजार ३४० रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४८ हजार ८१० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २१ हजार ७६० रुपये इतका नोंदवण्यात आला. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून प्रतिकिलो चांदीचा भाव उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

केंद्र सरकारने नुकतेच सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर झपाट्याने वाढू लागले. तज्ज्ञांच्या मते, वाढीव शुल्कामुळे पुढील काही दिवसांत सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढता कल असल्याने बाजारात मागणी कायम आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वरही सोन्या-चांदीच्या फ्युचर्समध्ये मोठी चढ-उतार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चांदीच्या दरात एका दिवसात तब्बल १७ हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर गुंतवणूकदारांचा कल पुन्हा मौल्यवान धातूंमध्ये वाढताना दिसत आहे.

दरम्यान, वाढत्या किंमतींमुळे सराफा बाजारातील ग्राहकसंख्या कमी झाल्याचे चित्र आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाही अनेक ग्राहक खरेदी पुढे ढकलत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबांवर याचा मोठा आर्थिक परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका फेडरल रिझर्व्हचे व्याजदर, डॉलरची स्थिती, कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक राजकीय घडामोडी यावर पुढील काळातील सोन्या-चांदीचे दर अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधपणे आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Exit mobile version