देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर ३ रुपयांनी वाढ करण्यात आली असून सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात आली असून त्यामुळे वाहनचालक, परिवहन क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
चार वर्षांनंतर प्रथमच देशात इतकी मोठी इंधन दरवाढ करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, होर्मूज सामुद्रधुनी परिसरातील तणाव आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे सरकारी तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. त्यातून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
कडक उन्हात आरोग्यासाठी वरदान ठरतेय कैरी!
यूपीमध्ये वादळ-पावसाचा कहर; १०४ जणांचा मृत्यू
इंग्लंडचा स्टार मिडफिल्डर, ज्याच्या सन्मानार्थ क्लबने ‘२२ नंबर’ जर्सीच रिटायर केली
लाजियोवर २-० मात करत इंटर मिलानचा कोप्पा इटालिया किताबावर कब्जा
नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ९७.७७ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचला आहे, तर डिझेल ९०.६७ रुपये प्रतिलिटर झाले आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि इतर महानगरांमध्येही इंधनाचे दर वाढले आहेत. राज्यनिहाय कर रचनेमुळे प्रत्येक शहरातील किंमती वेगवेगळ्या आहेत.
याचबरोबर दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन दर ७९.०९ रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत. मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी दरात २ रुपयांची वाढ जाहीर केली असून त्यामुळे सीएनजी ८४ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.
सीएनजी दरवाढीचा सर्वाधिक परिणाम ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. अनेक शहरांमध्ये रिक्षा आणि कॅब चालकांनी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचा रोजचा प्रवास अधिक महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्चही वाढणार आहे. त्याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, धान्य, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल-डिझेलसोबत सीएनजी महागल्याने वाहतूक आणि वितरण व्यवस्थेवर मोठा दबाव निर्माण होईल.
काही दिवसांपूर्वीच पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी तेल कंपन्यांना मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे इंधन दर कायम नियंत्रणात ठेवणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता प्रत्यक्ष दरवाढ लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, या निर्णयानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांवर आणखी आर्थिक भार टाकण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दुसरीकडे, सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या दिलास्याची घोषणा करण्यात आलेली नाही.
तज्ज्ञांच्या मते, जर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर आणखी वाढले, तर पुढील काळात पुन्हा इंधन दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे
