अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी Oracle ने भारतातील आयआयटी आणि एनआयटीमधील विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने कॅम्पस प्लेसमेंटदरम्यान दिलेल्या तब्बल ३५ ते ४० लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजच्या नोकरीच्या ऑफर्स अचानक रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर अडचणीत आले असून, प्लेसमेंट प्रक्रियेतील अनिश्चिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी
जालंधर बीएसएफ मुख्यालय स्फोट प्रकरणी टॅक्सी चालकाला अटक
“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केजरीवालांनी मर्यादा ओलांडल्या”
कर्नाटकात जानवे, रुद्राक्ष, हिजाब सगळे एकच!
देशातील आयआयटी रुडकी, आयआयटी हैदराबाद, आयआयटी बीएचयू, एनआयटी वारंगल आणि व्हीएनआयटी नागपूर यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांतील विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ऑरॅकलची ऑफर स्वीकारल्यानंतर इतर कंपन्यांच्या मुलाखती आणि ऑफर्स नाकारल्या होत्या. कारण बहुतांश संस्थांमध्ये “वन स्टुडंट, वन ऑफर” हे धोरण लागू असते. त्यामुळे एकदा ऑफर स्वीकारल्यानंतर दुसऱ्या कंपनीच्या प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. आता ऑरॅकलने ऑफर मागे घेतल्यामुळे हे विद्यार्थी पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत.
या घटनेमुळे अनेक विद्यार्थी सोशल मीडियावर आणि लिंक्डइनवर नवीन नोकरीच्या शोधात असल्याचे दिसत आहे. काही विद्यार्थ्यांनी आपली व्यथा सार्वजनिकपणे मांडली आहे. एनआयटी वारंगलमधील एका विद्यार्थ्याने सांगितले की, इंटर्नशिपनंतर त्याला प्री-प्लेसमेंट ऑफर मिळाली होती. मात्र जॉइनिंगच्या काही आठवडे आधीच कंपनीने ऑफर रद्द केल्याचा मेल पाठवला.
ऑरॅकलच्या या निर्णयामागे कंपनीतील मोठे रीस्ट्रक्चरिंग आणि जागतिक स्तरावरील नोकरकपात असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने जगभरातील सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. त्यामध्ये भारतातील जवळपास १२ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने हेल्थ आणि इन्फ्रास्ट्रक्चर विभागांमध्ये मोठे बदल केल्यामुळे नव्या भरतींवरही परिणाम झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात सुरू असलेली मंदी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनमुळे टेक कंपन्या खर्च कमी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे फ्रेशर्स आणि कॅम्पस प्लेसमेंटवर मोठा परिणाम होत आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, मोठ्या कंपन्यांच्या ऑफर्सवरही आता पूर्णपणे विश्वास ठेवता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
