कांदा-लसूण-आल्याने बजेट बिघडवलं! जुलैमध्ये महागाई ४.४५%

सर्वसामान्यांच्या घरखर्चावर वाढला दबाव

कांदा-लसूण-आल्याने बजेट बिघडवलं! जुलैमध्ये महागाई ४.४५%

देशातील महागाईचा दबाव पुन्हा वाढला असून, जुलै महिन्यात किरकोळ महागाई दर ४.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. जूनमध्ये हा दर ४.३८ टक्के होता. त्यामुळे अवघ्या एका महिन्यात महागाईत वाढ झाली असून, सलग दुसऱ्या महिन्यात महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा वर राहिला आहे. नव्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या मालिकेनुसार जुलैतील ४.४५ टक्के महागाई हा यंदाच्या आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे.

महागाई वाढण्यामागे सर्वात मोठे कारण खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ ठरली आहे. ग्राहक अन्न किंमत निर्देशांक म्हणजेच CFPI जूनमधील ५.३२ टक्क्यांवरून वाढून जुलैमध्ये ५.५२ टक्क्यांवर पोहोचला. विशेष म्हणजे शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात खाद्यपदार्थांच्या किमती अधिक वेगाने वाढल्या असून, ग्रामीण महागाई ५.७९ टक्के तर शहरी भागातील खाद्य महागाई ५.०५ टक्के राहिली.
हे ही वाचा:
अमित शहांचे वक्तव्य ऐकण्यात रस नाही!…राहुल गांधींचा चर्चेपासून पळ

नीट आंदोलनावर चर्चेसाठी अमित शहांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाच्या मुसक्या आवळल्या

इम्रान खान यांचा मृत्यू? पाकिस्तानी पत्रकाराचा दावा

भाजीपाल्याच्या किमतींनी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे. जुलैमध्ये कांद्याची महागाई ४.७३ टक्क्यांवरून थेट २२.५४ टक्क्यांवर पोहोचली. लसणाची महागाई १७.९३ टक्क्यांवरून ३५.३६ टक्क्यांवर गेली, तर आल्याच्या किमतीत तब्बल ८३.६२ टक्क्यांची महागाई नोंदवली गेली. त्यामुळे कांदा, लसूण आणि आल्याच्या वाढलेल्या दरांचा थेट परिणाम घरगुती खर्चावर झाला आहे. मात्र, बटाट्याच्या किमतीत १६.५६ टक्क्यांची घट झाली असून भेंडी, मटार आणि टोमॅटोच्या दरातही काहीशी नरमाई दिसून आली आहे.

महागाईचा परिणाम केवळ अन्नपदार्थांपुरता मर्यादित राहिलेला नाही. वाहतूक क्षेत्रातील महागाई जूनमधील ४.३१ टक्क्यांवरून वाढून ४.४३ टक्क्यांवर पोहोचली आहे. मालवाहतूक सेवांमध्ये महागाईचा दर ७.७७ टक्के राहिला. रेस्टॉरंट आणि निवास सेवांमध्ये ७.७२ टक्के, तर कपडे आणि पादत्राणांच्या किमतीत ३.३८ टक्क्यांची वाढ झाली. वैयक्तिक निगा आणि सामाजिक सुरक्षा संबंधित खर्चातील महागाई तब्बल १४.७७ टक्क्यांवर राहिली. आरोग्यसेवांमध्ये १.३४ टक्के आणि शिक्षण क्षेत्रात ३.६४ टक्के महागाई नोंदवण्यात आली.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने ऑगस्टच्या पतधोरण बैठकीत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा महागाईचा अंदाज ५.१ टक्क्यांवरून कमी करून ५ टक्के केला आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमाईमुळे पुढील काळात महागाईचा दबाव काहीसा कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत महागाई उच्च पातळीवर राहू शकते आणि त्यानंतर हळूहळू घटण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर महागाईचा दबाव कायम असला, तरी पुढील काही महिन्यांत परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

Exit mobile version