इराण-अमेरिका शांतता चर्चेचे अपयश; सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, तर रुपया कमजोर

इराण-अमेरिका शांतता चर्चेचे अपयश; सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला

आखती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. गेले अनेक दिवस बाजारात सातत्याने चढ- उतार दिसून येत आहे. रविवारी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे आयोजित अमेरिका-इराण ‘युद्धविराम’ शांतता चर्चा अपयशी ठरल्याचा परिणाम आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारावर उमटला. सोमवार, १३ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात बॉम्बे स्टॉक एक्सेंज सेन्सेक्स १,४०६.०५ अंकांनी म्हणजेच १.८१% घसरून ७६,१४४.२० वर आला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड निफ्टी ४११.७५ अंकांनी म्हणजेच १.७१% घसरून २३,६३८.८५ या पातळीवर व्यवहार करताना दिसला.

सकाळी बाजार उघडताच दबाव स्पष्ट दिसून आला. सेन्सेक्स ७६,१३४.३२ या पातळीवर १,४१५.९३ अंकांच्या घसरणीसह उघडला, तर निफ्टी २३,५७१.१५ वर ४७९.४५ अंकांनी खाली घसरला. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली मोठी वाढ आणि पश्चिम आशियातील वाढता तणाव ही या घसरणीची मुख्य कारणे ठरली. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १०१.८६ डॉलरपर्यंत पोहोचली आणि नंतर ती १०३ डॉलरच्या पुढे गेली. तर WTI क्रूडही सुमारे १०४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. अमेरिका-इराण शांतता चर्चा अपयशी ठरल्यानंतर या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की, अमेरिका इराणी बंदरांभोवती नौदल नाकाबंदी लागू करणार आहे. त्यांनी म्हटले, “तात्काळ प्रभावाने, युनायटेड स्टेट्स नेव्ही स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व जहाजांना रोखण्याची प्रक्रिया सुरू करेल.” तसेच त्यांनी इशारा देत म्हटले, “कोणताही इराणी आमच्यावर किंवा शांततापूर्ण जहाजांवर गोळीबार करेल, तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.”

इराणकडूनही कठोर भूमिका घेतली गेली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दावा केला की स्ट्रेट ऑफ होर्मुजवर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे आणि सर्व सागरी हालचाली त्यांच्या देखरेखीखाली आहेत. या वाढत्या तणावामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, त्यामुळे बाजारात अस्थिरता वाढली आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल?

“इराण चर्चेसाठी पुन्हा येवो अथवा न येवो, पर्वा नाही”

इराणचे नेते मोज्तबा खामेनींच्या चेहऱ्याला गंभीर दुखापती, पायही निकामी?

युद्धाचा धोका वाढला तरी भारत ‘सुरक्षित’!

दरम्यान, क्षेत्रनिहाय निर्देशांकांवर नजर टाकल्यास सर्वच क्षेत्रे घसरणीत उघडली. निफ्टी पीएसयू बँक आणि रिअल्टी निर्देशांकात ३% पेक्षा जास्त घसरण झाली, तर ऑटो, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रात २% पेक्षा अधिक घट झाली. कंपनी स्तरावरही मोठा दबाव दिसून आला. इंडिगोच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात ६% पेक्षा अधिक घसरण झाली, तर ज्योती CNC च्या शेअर्समध्ये ११% पेक्षा जास्त घट झाली. व्यापक बाजारातही कमजोरी दिसली, जिथे निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक २.२८% आणि स्मॉलकॅप १०० निर्देशांक २.६०% ने खाली आला.

दरम्यान, भारतीय रुपयाही कमजोर झाला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५७ पैशांनी घसरून ९३.३० वर उघडला. यापूर्वी शुक्रवारी तो ९२.७३ या पातळीवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते, स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील वाढता तणाव आणि तेलाच्या किंमतीतील वाढ याचा परिणाम पुढील काही दिवसही बाजारावर कायम राहू शकतो.

Exit mobile version