महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळत असून दोन प्रमुख उद्योग समूहांनी तब्बल १.७५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यात ११ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या दोन्ही कंपन्यांसोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आले. राज्याच्या औद्योगिक विकासासाठी ही गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या गुंतवणुकीत पश्चिम बंगालमधील श्याम स्टील उद्योग समूह मोठी भूमिका बजावत आहे. हा समूह चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी येथे सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे ८ हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहेत. या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
अमेरिका, जर्मनी, इटलीच्या एकत्रित साठ्यापेक्षाही जास्त सोने भारतीय कुटुंबांकडे
बॉयलर स्फोट प्रकरणी वेदांताचे अनिल अग्रवालविरुद्ध एफआयआर
विनोद कांबळीच्या मदतीसाठी सचिनसह मित्रांनी तयार केला ग्रुप !
विप्रो हायड्रॉलिक्सकडून इटलीच्या इंडेको कंपनीचा ताबा
याशिवाय, जे.डब्ल्यू. ग्लोबल इंडिया कंपनी राज्यात तब्बल १ लाख ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पातून सुमारे ३ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. या गुंतवणुकीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असून विविध क्षेत्रांत औद्योगिक संधी वाढतील.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात फ्लोटिंग सोलर पॉवर आणि ऊर्जा साठवण (एनर्जी स्टोरेज) प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १४,९७६ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ५०० कायमस्वरूपी रोजगार निर्माण होतील. हरित ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती अधिक मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
राज्यातील या मोठ्या गुंतवणुकीमुळे औद्योगिक विकासाला गती मिळण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा सारख्या भागांमध्ये उद्योग विस्तारामुळे आर्थिक विकासाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकूणच, या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात आणखी सक्षम होत असून देशातील गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र म्हणून राज्याची ओळख अधिक दृढ होत आहे.
