भारतातील आघाडीची ब्युटी आणि फॅशन ई-कॉमर्स कंपनी ‘नायका’ने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत जबरदस्त आर्थिक कामगिरी करत बाजाराचे लक्ष वेधून घेतले आहे. सौंदर्यप्रसाधने, फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांच्या विक्रीत सातत्याने वाढ होत असल्याने कंपनीच्या नफ्यात तब्बल 286 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या दमदार निकालानंतर शेअर बाजारातही कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘नायका’ची मूळ कंपनी एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडने जाहीर केलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च २०२६ या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ७८ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला केवळ २० कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यामुळे एका वर्षात कंपनीने नफ्यात जवळपास चारपट वाढ नोंदवली आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा:
बंगळुरूत एअर इंडियाच्या विमानाला ‘टेल स्ट्राइक’
शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा चिंता
ट्रम्प यांच्या विधानाने कच्च्या तेलाच्या बाजारात खळबळ
पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार हमजा बुरहानचा पाकव्याप्त काश्मीरमध्ये खात्मा
कंपनीच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचे ऑपरेशन्समधून मिळालेले उत्पन्न २८ टक्क्यांनी वाढून २ हजार ६४८ कोटी रुपयांवर पोहोचले. मागील वर्षी हे उत्पन्न २ हजार ६२ कोटी रुपये होते. ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल आणि ब्युटी उत्पादनांची वाढती मागणी यामुळे कंपनीला मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.
‘नायका’च्या व्यवसाय विस्ताराचाही वेग कायम आहे. कंपनीचा ग्रॉस मर्चेंडाइज व्हॅल्यू म्हणजेच एकूण विक्री मूल्य ५ हजार २४१ कोटी रुपयांवर पोहोचले असून, त्यातही २८ टक्क्यांची वाढ झाली आहे. सलग १४ तिमाहींमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ कायम राखण्यात कंपनीला यश आले आहे. त्यामुळे डिजिटल ब्युटी मार्केटमध्ये ‘नायका’ची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.
कंपनीच्या ऑपरेशनल कामगिरीतही मोठी सुधारणा झाली आहे. ईबीआयटीडीए म्हणजेच व्याज, कर आणि घसारा वजा करण्यापूर्वीचा नफा ६७ टक्क्यांनी वाढून २२३ कोटी रुपयांवर पोहोचला. खर्चावर नियंत्रण ठेवत विक्री वाढवण्यात कंपनी यशस्वी ठरल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केला तर ‘नायका’ने वार्षिक पातळीवरही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा जवळपास तिपटीने वाढून १९९ कोटी रुपयांवर गेला, तर वार्षिक महसूल १० हजार २२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. मागील वर्षी हा महसूल ७ हजार ९५० कोटी रुपये होता.
तज्ज्ञांच्या मते, भारतातील वाढते डिजिटल ग्राहक, सौंदर्यप्रसाधनांची वाढती मागणी आणि मजबूत ब्रँड ओळख यामुळे ‘नायका’ला आगामी काळात आणखी फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांचे लक्ष कंपनीच्या शेअर्सकडे लागले आहे.
