नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ‘आयपीओ’ला सेबीचा ग्रीन सिग्नल!

५.२६ लाख कोटींच्या मूल्यांकनाचे लक्ष्य

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ‘आयपीओ’ला सेबीचा ग्रीन सिग्नल!

देशातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतीक्षित आयपीओपैकी एक असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) आयपीओला बाजार नियामक सेबीकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाले आहे. त्यामुळे एनएसईला शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी फिक्कीच्या वार्षिक भांडवली बाजार परिषदेत सेबीच्या मंजुरीबद्दल माहिती दिली.

मात्र, एनएसईच्या आयपीओसाठी दाखल करण्यात आलेल्या मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसला (डीआरएचपी) सेबीची अंतिम मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. आयपीओचा अंतिम आकार, मूल्यांकन आणि लिस्टिंगची तारीख बाजारातील परिस्थिती तसेच रोडशोदरम्यान गुंतवणूकदारांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून राहणार आहे.

एनएसईने १७ जून २०२६ रोजी आयपीओसाठीची मसुदा कागदपत्रे सेबीकडे दाखल केली होती. यापूर्वी एनएसईच्या शेअर्सचे सप्टेंबर २०२६ पर्यंत बीएसईवर लिस्टिंग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आता सेबीकडून एनओसी मिळाल्याने या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे.

बाजारातील अंदाजानुसार, एनएसईच्या आयपीओचा आकार ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकतो. असे झाल्यास हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. सध्या ह्युंदाई मोटर इंडियाचा २७,८७० कोटी रुपयांचा आयपीओ या विक्रमावर आहे. याशिवाय, एनएसई आपल्या आयपीओद्वारे तब्बल ५.२६ लाख कोटी रुपये म्हणजेच ५५ अब्ज डॉलरपर्यंतचे मूल्यांकन मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे यापूर्वी समोर आले आहे.

हे ही वाचा:

सकाळी १० वाजले तरी ऑफिस रिकामं! बंगळुरूच्या ट्रॅफिकला कंपन्या हैराण

जेन झीला आकर्षित करण्यासाठी सरकारी बँकांनी ‘कूल’ व्हावे

भारतीय कार बाजाराला वेग! FY31 पर्यंत ६३ लाख वाहनांची विक्री शक्य

आयएसआय कनेक्शन असलेल्या वहाब आलमच्या तिसऱ्या साथीदाराला बेड्या

एनएसईचा प्रस्तावित आयपीओ पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) स्वरूपाचा आहे. म्हणजेच कंपनीकडून नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. विद्यमान भागधारक आपल्याकडील शेअर्सची विक्री करणार आहेत. मसुदा कागदपत्रांनुसार, विद्यमान भागधारक १४.८९ कोटी इक्विटी शेअर्स विकणार आहेत. हे एनएसईच्या पेड-अप इक्विटी भांडवलाच्या जवळपास ६ टक्के आहे. त्यामुळे आयपीओतून मिळणारे पैसे थेट एनएसईच्या तिजोरीत जाणार नाहीत, तर शेअर्स विकणाऱ्या विद्यमान भागधारकांना मिळतील.

एनएसईने आयपीओच्या प्रक्रियेसाठी २० बँका आणि वित्तीय संस्थांची नियुक्ती केली आहे. यामध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, जेएम फायनान्शियल, मॉर्गन स्टॅनले, एचएसबीसी आणि सिटीग्रुप यांसारख्या आघाडीच्या संस्थांचा समावेश आहे. एनएसईचा आयपीओ प्रत्यक्षात आल्यास तो भारतीय भांडवली बाजारासाठी मोठी ऐतिहासिक घडामोड ठरणार आहे. ३० हजार कोटी रुपयांहून अधिक आकार आणि ५.२६ लाख कोटी रुपयांपर्यंतचे संभाव्य मूल्यांकन यामुळे देशभरातील गुंतवणूकदारांचे या आयपीओकडे विशेष लक्ष लागले आहे.

Exit mobile version