आज, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी, भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल सुमारे २,००० अंकांनी वाढून ८३,८०० च्या आसपास पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० सुमारे ६४० अंकांनी वाढून २५,७०० च्या पुढे गेला. एका दिवसात जवळपास २.५ ते ३ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदवली गेल्याने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
या तेजीमागील प्रमुख कारण म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत निर्माण झालेली सकारात्मक अपेक्षा. अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क, म्हणजेच टॅरिफ, कमी होणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांसाठी अमेरिकन बाजार अधिक खुला होऊ शकतो, असा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे. याच अपेक्षेमुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.
हे ही वाचा:
भारतीय कायद्यांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही!
“ये नया हिंदुस्तान है… घर में घुसेगा भी और मारेगा भी”; धुरंधर २ चा टीझर प्रदर्शित
२०२७ एशियन शूटिंगचे यजमानपद भारताकडे
सोने- चांदीच्या घसरणीला ब्रेक; चांदीचे दर २१,००० ने वाढले
आजच्या व्यवहारात निर्यात-आधारित क्षेत्रांनी विशेष चांगली कामगिरी केली. टेक्सटाइल्स, ऑटो अँसिलरी, इंजिनिअरिंग वस्तू आणि केमिकल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली. निफ्टी ऑटो निर्देशांक सुमारे ७०० अंकांनी, तर निफ्टी बँक निर्देशांक सुमारे १,५०० अंकांनी वाढला. बँकिंग क्षेत्रातील मोठ्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला मोठा आधार मिळाला.
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संकेत मिळाले. आशियाई बाजार मजबूत होते, तर अमेरिकन बाजारातही मागील सत्रात वाढ नोंदवली गेली होती. याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार पुन्हा भारतीय बाजाराकडे वळताना दिसत असून, याचा परिणाम चलन बाजारावरही झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया ९०.३५ ते ९०.४० रुपयांच्या पातळीवर मजबूत झाल्याचे पाहायला मिळाले.
शेअर बाजारातील या तेजीचा परिणाम केवळ इक्विटी मार्केटपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याचा प्रभाव थेट कमॉडिटी बाजारावरही दिसून आला.
