मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १० दहशतवादी ठार

मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १० दहशतवादी ठार

मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाल्याचे वृत्त आहे. यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या जवानांशी झालेल्या चकमकीत दहा दहशतवादी ठार झाले, अशी माहिती भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने दिली आहे. ही मोहीम अद्याप सुरू असल्याची माहिती आहे.

लष्कराच्या पूर्व कमांडने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारत- म्यानमार सीमेजवळील चांदेल जिल्ह्यातील खेंगजोय तहसीलमधील न्यू समताल गावाजवळ सशस्त्र कार्यकर्त्यांच्या हालचालींबद्दल विशिष्ट गुप्त माहितीवरून कारवाई करत, स्पीअर कॉर्म्सच्या अंतर्गत आसाम रायफल्स युनिटने १४ मे २०२५ रोजी एक ऑपरेशन सुरू केले.” हा भाग भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असून अनेकदा दहशतवादी कारवायांचे केंद्र राहिला आहे.

लष्कराच्या पूर्व कमांडने दिलेल्या माहितीनुसार, स्पीअर कॉर्प्सच्या अंतर्गत आसाम रायफल्स युनिटने १४ मे २०२५ रोजी शोधमोहिम राबवली. सैनिकांनी परिसराला वेढा घातला. संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल आसाम रायफल्‍सच्‍या जवानांनी संयमाने गोळीबार केला. या चकमकीत १० दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचेही लष्कराने म्हटले आहे. तसेच परिसरात आणखी दहशतवादी लपण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम अजूनही सुरू आहे. या कारवाईदरम्यान कोणताही सुरक्षा दलाचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

हे ही वाचा:

तिथे बोरॉन आले, इथे बरनॉल येऊ दे…

छत्तीसगढच्या करेगुट्टात ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान!

तापसी पन्नूने कुठे वाटले वॉटर कूलिंग जग

तुर्की उपकार विसरलेला देश

मे २०२३ पासून, मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहे. या संघर्षांमध्ये आतापर्यंत १३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सुमारे ६०,००० लोकांना आपले घर सोडून मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यातील संवेदनशील भागात लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. तर, मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे.

Exit mobile version