पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पेकाट मोडण्याचे आदेश, सेना दलांना दिले होते. ७ मे रोजी याची सुरुवात झाली. पुढे चार दिवसांत सेनादलांनी पाकिस्तानचा कार्यक्रम करून टाकला. आता मोदी पाकिस्तानचे नरेटीव्ह वॉर उद्ध्वस्त करण्याच्या कामाला लागले आहेत. आदमपूर हवाईतळाला भेट देऊन त्यांनी याची सुरूवात केलेली आहे. एस-४०० सोबत झळकलेली मोदींची छवी पाकिस्तानच्या थापांच्या चिंधड्या उडवून गेली. आदमपूर हवाईतळासोबत भारताचे २६ लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा करणारे पाकिस्तानी नेते आणि लष्करी अधिकारी तोंडावर पडले. विरोधकांनी सुरू केलेल्या देशी नरेटीव्हला चूड लावण्याचे काम त्यांना आता करावे लागणार आहे.
भारत – पाकिस्तान दरम्यान सुरू असलेला संघर्ष स्थगित झाल्यानंतर पाकिस्तानच्या नेत्यांनी विजयाचे ढोल वाजवायला सुरूवात केली. पाकिस्तानचे झेंडे हाती घेऊन पाकिस्तानी लोकांच्या मिरवणुका निघाल्या. भारत आता आपले अस्तित्वच संपवणार असे वाटत असताना प्रकरण ११ हवाई तळ, हवाई कवच, रडार यंत्रणांच्या विनाशावर आटोपले, हाच विजय आहे, हे पाकिस्तानला वाटले तर ते चुकीचे नाही. आटोपत आलेले अस्तित्व टीकले हाच त्यांच्यासाठी मोठा विजय आहे.
अमेरीकी संरक्षण विश्लेषक जॉन स्पेन्सर, डेरेक ग्रॉसमन, ऑस्ट्रेलिअन संरक्षण विश्लेषक टॉम कूपर यांनी पाकिस्तानच्या नरेटीव्ह वॉरचा फुगा फोडला आहे. टॉम कूपर यांनी तर स्पष्ट शब्दात सांगितले आहे, या चार दिवसाच्या संघर्षात
भारताचा मोठा विजय झाला आहे.
पाकिस्तानी हवाईदलाची २० टक्के क्षमता भारतीय सेनादलांनी संपवली. भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना लक्ष्य केल्यानंतरही भारताला उत्तर देण्याइतपत क्षमता त्यांच्याकडे उरलेली नाही. भारताला रोखण्याची क्षमता पाकिस्तानकडे नाही. चार दिवसांच्या संघर्षात पाकिस्तानचे जे नुकसान झाले आहे, ते भरून काढण्यासाठी काही वर्षे लागतील.
पाकिस्तानची अवस्था छत नसलेल्या घरासारखी झालेली आहे. दक्षिण आशिया, भारत-चीन, चीन-अमेरीकेच्या संबंधाकडे बारीक नजर ठेवणाऱ्या संरक्षण विश्लेषक, भू-राजकीय विश्लेषक यांनी त्यांच्या पद्धतीने परिस्थितीचे आकलन करून दिलेला निर्वाळा भारताच्या निर्विवाद विजयावर शिक्कामोर्तब करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पद्धतीने पाकिस्तानच्या नरेटीव्हचे नाक ठेचले आहे. त्यांनी पंजाबमधील आदमपूर हवाईतळाला भेट दिली. जवानांशी संवाद साधला.
हवाई तळावर मिग-२९ आणि एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली सह मोदींची छायाचित्र जगभरात झळकली. हाच आदमपूर हवाईतळ उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानच्या डीजीआयएसपीआर अहमद शरीफ कुरेशी याने केला होता. ‘आदमपूर सह भारतातील २६ लष्करी आस्थापनांना आम्ही लक्ष्य करून त्यांना उद्ध्वस्त केले’, असा दावा त्यांनी केला होता.
हे ही वाचा:
छत्तीसगढच्या करेगुट्टात ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान!
तापसी पन्नूने कुठे वाटले वॉटर कूलिंग जग
मराठमोळ्या सरन्यायाधीशांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
मोदींनी यांनी आदमपूर हवाई तळाला भेट देऊन या हवाई तळाचा कपचाही उडालेला नाही, हे जगाला दाखवून
दिले. पाकिस्तानच्या प्रचाराचा ढोल फोडला. सगळीकडे जाऊन हे दाखवण्याची मोदींना गरज नाही. जगालाही शीतावरून भाताची परीक्षा करता येते. पाकिस्तानचे राजकीय नेते, लष्करी अधिकारी जे काही करतायत ती त्यांची मजबूरी आहे. भारताने आपल्याला मरेस्तोवर मारले हे जर कबूल केले तर जनता विवस्त्र करून वरात काढेल, हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे थापा हाच त्यांचा जीवनाधार बनला आहे. भारताने सरगोधा हवाईतळावर हल्ला केल्यामुळे जे काही भोग पाकिस्तानच्या आलेले आहेत, ते भोगण्याची तयारी तिथे सुरू आहे. किरणोत्सर्गाचे भोग टाळण्यासाठी बोरॉनचे साठे तिथे मागवले जात आहेत. चीन, इजिप्तच्या मार्फत ते मिळवले जात आहेत. फाटलेली जखम शिवण्याच्या कामाला पाकिस्तानी नेते लागलेले आहेत.
जनरल मौलाना आसिफ मुनीर अजून बंकरच्या बाहेर येण्याचे धाडस करताना दिसत नाही. भारताच्या क्षेपणास्त्रांना
पत्ता लागला तर आपले काही खरे नाही, हे त्याला कळून चुकले आहे. पाकिस्तानमध्ये बोरॉनचे साठे पोहोचले, भारता बरनॉलचे साठे कधी पोहोचतील याची अनेकांना प्रतीक्षा आहे. भारतावर झालेला प्रत्येक दहशतवादी हल्ला ही मोदींनी ठोकण्याची उत्तम संधी अशी मानसिकता असलेले भारतातील काही नेते प्रचंड अस्वस्थ आहेत. लाहोर घेण्याची संधी मोदींमुळे हुकली, ही पीओके घेण्याची संधी होती, असे उसासे ही मंडळी सोडतायत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला युद्ध विराम कऱण्यास भाग पाडले अशी टीका करून ही मंडळी मोदी विरोधाचा कंड भागवातायत. मोदींकडे खुलासे मागतायत.
२६/११ च्या हल्ल्यानंतर जगभरात डॉसिअरचे कागदी घोडे नाचवणारे काँग्रेसचे नेतेही यात आहेत. १६६ भारतीयांचा बळी गेल्यानंतरही ज्यांना पाकिस्तानचे वाकडे करता आले नाही, ते मोदींना सल्ले देतायत. भाजपाला फायदा होईल, म्हणून ज्यांनी पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली नाही, ती कारवाई करण्यास इच्छूक असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना गप्प बसवले, त्यांनाही कंठ फुटलेला आहे. त्या काळात पीएमओमध्ये राज्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनाही कंठ फुटलेला आहे. खरे तर त्यांना काँग्रेसचा हा नाकर्तेपणा ठाऊक आहे. तेही या नाकर्तेपणाचे अविभाज्य घटक होते. मुळात मोदींना काही सल्ले देण्यापूर्वी या सगळ्या लोकांनी कान पकडून उठाबशा काढल्या पाहिजेत.
भारताने अमेरिकेच्या स्टील आणि एल्युमिनिअमवर आयात कर लावण्याचे सुतोवाच केल्याचे संकेत ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटीव्ह’ या संस्थेने दिले आहेत. व्यापाराचे गाजर दाखवून ही शस्त्रसंधी केल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला गाडण्यासाठी भारत हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. काश्मीरप्रकरणी भारत कोणतीही मध्यस्थी स्वीकारणार नाही, काश्मीर बाबत पाकिस्तानशी चर्चा केवळ पीओके कधी खाली करणार एवढ्या पुरती मर्यादित आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरवरून हजार वर्षे संघर्ष सुरू आहे, हे विधान करून ट्रम्प
यांनी आपल्या बुद्धिमत्तेचे जाहीर प्रदर्शन केले आहे. काश्मीरबाबत चिंता व्यक्त करून या प्रश्नावर मध्यस्थी कऱण्याच्या त्यांच्या सुरसुरीचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यवस्थित इलाज केलेला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ताज्या पत्रकार परिषदेत भारताची ही भूमिका ठणकावून सांगितली आहे.
पाकिस्तानात बोरॉन आले, परंतु भारतात बरनॉलची गरज आहे. भारतात असलेला बरनॉलचा साठा वारंवार वापरून संपला असल्यामुळे भारत-पाक संघर्षानंतर भारतातील बरेच राजकीय नेते बरनॉलच्या प्रतीक्षेत आहेत. उरी सर्जिकल स्ट्राईक २०१६, बालाकोट हवाई हल्ला २०१९ या दमदार कारवाया करून भारताने पाकिस्तानचे दात घशात घातले होते, तेव्हा काही मंडळी पुरावे मागत फिरत होती. ताज्या संघर्षात हे पुरावे आधी पाकिस्तानच्या मीडियाने दिले, नंतर भारताच्या लष्कराने दिले. पाकिस्तानचे रक्तबंबाळ झालेले थोबाड ज्यांना दिसते आहे, त्यांना वेगळ्या पुराव्यांची गरज नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर ही पुरावे गँग, अरेरे लाहोर घेता आले असते, अरेरे पाकिस्तान घेता आले असते, अशी हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत.
या चार दिवसांच्या युद्धानंतर अनेकांना इंदिरा गांधी यांची आठवण होत आहे. ज्यांना भारतीय सेनादलांच्या १९७१ च्या अभूतपूर्व विजयानंतर पाकिस्तानचे ९३ हजार युद्ध कैदी सोडण्याची दर्यादिली तर सुचली, परंतु पाकिस्तानच्या
तुरुंगातील आपला एकही सैनिक सोडवता आला नाही, पीओके घेता आला नाही, की चिकन नेकची समस्या सोडवता आली नाही. इतिहास हे सदैव लक्षात ठेवेल की, २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला ठोकले, नेहरुंनी लादलेला भारतावर अन्याय करणारा सिंधू जलवाटप करार मोडीत काढला. पीओके घेतला तर तो मोदीच घेतील हा भारतीयांचा विश्वास ७ ते १० मे या काळात वृद्धिंगत झालेला आहे. पाकिस्तानविरोधी धडक कारवाईमुळे लोकप्रिय झालेले मोदी विरोधकांसाठी दयाबुद्धी दाखवून मुबलक प्रमाणात बरनॉलचीही व्यवस्था करतील याचाही आम्हाल विश्वास आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
