पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा देशांच्या दौऱ्यावर आहेत. बदलत्या भूराजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशाचे अर्थकारण जपण्याच्या आणि वाढवण्याच्या दृष्टी हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने यूएईचा दौरा फलदायी ठरला. नेदरलॅंड भेटी दरम्यान ASML सोबत झालेला करार भारताचे भविष्य सुरक्षित करणारा आहे. सेमी कण्डक्टरच्या क्षेत्रात भारत जी उडी घ्यायला सज्ज झालेला आहे, त्यात नेदरलंडची भूमिका महत्वाची असेल. नेदरलँड आणि तैवानसोबत भारत सेमी कण्डक्टरचे शिवधनुष्य लीलया पेलू शकेल असे ठामपणे सांगता येईल. एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा अगदीच पडेल झाला असताना मोदींनी फक्त दोन देशांमध्ये भारतासाठी जे काही मिळवले ते प्रशंसेला पात्र आहे.
नेदरलॅंड हा युरोपातील महत्वाचा देश. लिथोग्राफि मशीन निर्मिती क्षेत्रातील एकाधिकारामुळे सेमी कण्डक्टर निर्मितीच्या क्षेत्रात नेदरलँडला मोठे महत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ मे रोजी नेदरलँडला भेट दिली. पंतप्रधान रॉब जेटन यांची भेट घेतली. याच दौऱ्या दरम्यान टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने ASML सोबत महत्वाचा सामंजस्य करार केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर असे ठामपणे सांगता येईल की, हा करार केवळ भारताच्या दृष्टीने नाही तर जगाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीन दौरा करून परतले. या दौऱ्यात ट्रम्प यांनी तैवानचा कोरा चेक चीनला दिला आहे. ‘चीनचे तैवान पासून अंतर ६८ मैल आहे, अमेरिका तैवानपासून ९५०० मैल अंतरावर आहे’, असे सुचक उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.
‘तैवानचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने हाताळाला तर संघर्ष उडेल’, अशी प्रछन्न धमकी शि जिनपिंग यांनी दिल्यानंतरही ट्रम्प त्यांना उत्तर देऊ शकले नाहीत. तैवान मुदद्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी साफ दुर्लक्ष केले. याचा अर्थ स्पष्ट आहे. उद्या चीनने तैवानचा घास घेतला तर अमेरिका फार काही करण्याची शक्यता नाही. तैवानचा चीनने घास घेण्याचा अर्थ प्रगत सेमी कण्डटर चिपच्या बाजारपेठेवर चीनचा कब्जा होणे. या पार्श्वभूमीवर मोदी यांची नेदरलँड भेट महत्वाची ठरते.
नेदरलॅंड अशा परिस्थितीत हुकूमाचा एक्का ठरण्याची शक्यता आहे. कारण लिथोग्राफी मशीन शिवाय सेमी कण्डक्टर चीपची निर्मिती होऊ शकत नाही. अमेरिका आणि युरोपियन युनियनने या मशिनची चीनला निर्यात करण्यावर कठोर निर्बंध लादले आहेत. लिथोग्राफी मशीनची निर्मिती केली आहे, असा दावा चीनने केला आहे. परंतु त्यात फार तत्थ नाही. चीनी मालाचा दर्जा काय असतो हे ऑपरेशन सिंदूरच्या काळात जगाने पाहीले आहे. जे चीनला नाकारण्यात आले. ते भारताला देण्यास ASML ने करार केला आहे.
हे ही वाचा:
कोकणचा आंबा… काजू… आणि ताठ मानेचा शेतकरी!
नीट पेपर लीक प्रकरण: ५ लाखात पेपर खरेदी केल्याचा आरोप
गुजरातच्या दाहोदमध्ये कारमध्ये सापडले २.५६ कोटी रोख
चांदी आता मुक्त नाही प्रतिबंधित
गुजरातच्या ढोलेरामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा प्लांट आहे. इथे तैवान, भारत आणि नेदरलॅंडची युती झालेली दिसते. इथे जे काही साकारते आहे ते केवळ भारताच्या दृष्टीने नाही तर जगाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने २०२० मध्ये सेमी कण्डक्टरच्या क्षेत्रात उडी घेतली. ढोलेरात प्लांटची निर्मिती कऱण्यात आली. सुरूवातीला तैवानच्या पीसीएमसी (PCMC) या कंपनीसोबत टाटाने सामंजस्य करार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेदरलँड भेटी दरम्यान एएसएमएल (ASML) कंपनीसोबत टाटा इलेक्ट्रॉनिक्सने करार केला. कंपनीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रणधीर ठाकूर आणि एएसएमएलच्या (ASML) वतीने ख्रिस्तोफर फुके यांनी या करारावर सह्या केल्या. पीसीएमसी (PCMC) आणि एएसएमएल (ASML) या दोन्ही कंपन्यांशी हातमिळवणी केल्याशिवाय टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा गुजरातच्या ढोलेरा येथील प्रकल्प पुढे जाणे शक्यच नव्हते.
ढोलेरामध्ये साकारलेल्या या प्रकल्पात ११ अब्ज डॉलर गुतंवणूक अपेक्षित आहे. कारण PCMC ही कंपनी सॉफ्टेवअर तर ASML ही कंपनी हार्डवेअरच्या क्षेत्रात मातबर मानली जाते. सेमी कण्डक्टर फॅब निर्मितीसाठी या दोन्ही बाजू अत्यंत महत्वाच्या आहेत. चिपचे डीझाईन कसे करायचे, निर्मितीची प्रक्रीया कशी असेल, याचे ज्ञान PCMC च्या तज्ज्ञांना आहे. इथे दरमहा ५० हजार वेफर्स बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तैवानची PCMC असो TSMC असो, अमेरिकेची INTEL किंवा दक्षिण कोरीयातील SAMSUNG. लिथोग्राफिक मशीन्स शिवाय कोणतीही कंपनी इंचभर पुढे जाऊ शकत नाही.
ही मशीन केवळ ASML बनवू शकते. सिलिकॉन वेफरच्या एका छोट्या तुकड्यावर अब्जावधी ट्रान्झिस्टरचे डीझाईन असते. अत्यंत सुक्ष्म किरणांचा वापर करून हे डीझाईन बनवण्याचे काम लिथोग्राफि मशीन द्वारा केले जाते. एका लिथोग्राफि मशीनमध्ये एक लाखावर सुटे भाग असतात.
भारत दरवर्षी १५ ते १७ अब्ज सेमी कण्डक्टर चिप वापरतो. ज्याच्या आयातीसाठी दरसाल आपण ४० अब्ज खर्च करतो. ही गरज वाढत जाणार आहे. २०३० पर्यंत आपल्याला चीपसाठी १०० अब्ज खर्च करावे लागतील. भारतात जर निर्मिती शक्य झाली तर ही रक्कम वाचू शकते.
ढोलेरामध्ये ३०० मिमि (१२ इंच) सेमी कण्डक्टर चीपचे उत्पादन होणार आहे. केवळ फॅब निर्मिती नाही. ‘स्थानिक टॅलेंटला संधी आणि प्रशिक्षण देणारा हा करार आहे’, डॉ.ठाकूर यांनी तसे स्पष्ट केले आहे. ‘या करारामुळे एएसएमएलच्या तज्ज्ञांकडून स्थानिकांना प्रशिक्षण मिळेल आणि स्थानिक पातळीवर अभियंते तयारी होतील. आमचा ढोलेरातील प्लांट वेळेत कार्यान्वित होईल.’ असेही त्यांनी सांगितले. ख्रिस्तोफर फुके यांनीही सांगितले आहे, ‘आम्हाला भारतीय टॅलेंटला संधी द्यायची आहे.’
तैवानच्या PSMC या कंपनीसोबत टाटाने केलेल्या करारामुळे २८, ४०, ५५, ९० आणि ११० नॅनो मीटरच्या चीप निर्मितीचा मार्ग मोकळा झालेला आहे. ASML सोबत झालेल्या करारामुळे निर्मितीसाठी लागणाऱी यंत्रे, उपकरणे उपलब्ध होणार आहेत. तैवानची भूमिका यात अत्यंत महत्वाची आहेत. ASML कडून येणारी लिथोग्राफीक मशीन्स कशी जोडायची, वापरायची, त्याची देखभाल कशी करायची याचे मार्गदर्शन तैवानी अभियंते कऱणार आहेत.
चीनचे संकट लक्षात घेऊन तैवानच्या अनेक कंपन्यांनी भारतात काम सुरू केले आहे. भारतात चीप डीझाईनिंगसाठी, मेकींग, पॅकेजिंगसाठी आवश्यक बुद्धिमत्ता आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. तैवान जर भविष्यात चीनच्या ताब्यात गेले तर जगाच्या दृष्टीने भारत हा पर्याय ठरू शकतो.
गॅलियम आणि जर्मेनियमसारख्या रेअर अर्थ मिनरल्सची निर्यात नियंत्रित करून चीनने जगाला वाकायला भाग पाडले. उद्या तैवानचा कब्जा घेतल्यानंतर सेमी कण्डक्टर चीपबाबत चीन वेगळे काही करण्याची शक्यता नाही. नेदरलँडने लिथोग्राफी मशीनची चीनला निर्यात रोखली आहे. उद्या यदाकदाचित तैवान चीनच्या ताब्यात गेला तर चीन लिथोग्राफी मशीन द्यायला नेदरलँडला भाग पाडेल. चीनबाबत जगाची मानसिकता भारताच्या पथ्यावर पडणार आहे.
सेमी कण्डक्टरच्या प्रांतातील अवलंबित्व संपण्याचे भारतासाठी बरेच अर्थ आहेत. औषध निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, सुपर कम्प्युटर, एआय आणि क्वांटम कम्प्युटरच्या क्षेत्रात भारताची आगेकूच वेगाने होऊ शकेल. पंतप्रधान मोदींचा सहा देशांचा विदेश दौरा भारतीय अर्थकारणाला गती देण्यासाठी होता हे निर्विवाद आहे. यूएईसोबत हातमिळवणी करून मोदींनी आपली ऊर्जा सुरक्षा अबाधित ठेवली. नेदरलॅंड सोबत हातमिळवणी करून देशाचे भविष्य सुरक्षित केले.
एका बाजूला ट्रम्प यांचा दौरा तोंडावर पडला. त्यांच्यासोबत चीनमध्ये गेलेल्या अमेरिकी उद्योगपतींचा ताफा हात हलवत परतला. एकही नेत्रदिपक डील हाती लागले नाही. त्यातुलनेत नरेंद्र मोदी यांनी फक्त नेदरलँड आणि यूएईमध्ये जे मिळवले ते भव्यदिव्य आहे. अजून नॉर्वे, स्वीडन, इटलीचा दौरा शिल्लक आहे. ट्रम्प हे उद्योगपती आहेत, मोदी म्हणजे अनेकांच्या दृष्टीने चहावाला. परंतु धंदा मोदींना जास्त कळतो. ते जास्त चांगले डील करू शकतात हे त्यांच्या ताज्या दौऱ्यावरून पुन्हा उघड झाले आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







