पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आर्थिक परिस्थितीबाबत आतापर्यंतचा सर्वात गंभीर इशारा दिला. पाच देशांच्या युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात नेदरलँड्समधील द हेग येथे पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जग सध्या “आपत्तींच्या दशकातून” जात आहे. सध्याच्या जागतिक संकटांवर लवकर नियंत्रण मिळवले नाही, तर गरिबी निर्मूलनासाठी गेल्या अनेक दशकांत झालेली प्रगती पूर्णपणे नष्ट होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
द हेग येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधानांनी युद्धस्थिती, ऊर्जा संकट आणि इतर आंतरराष्ट्रीय समस्यांना जागतिक अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले. जागतिक घडामोडींवर भाष्य करताना मोदी म्हणाले, “जग नव्या आव्हानांना सामोरे जात आहे. आधी कोरोना महामारी आली, त्यानंतर युद्धे सुरू झाली आणि आता ऊर्जा संकट उभे राहिले आहे. हे दशक जगासाठी आपत्तींचे दशक ठरत आहे.” ते पुढे म्हणाले, “जर सध्याची परिस्थिती लवकर नियंत्रणात आणली नाही, तर गेल्या अनेक दशकांतील उपलब्धी वाहून जातील आणि जगातील मोठी लोकसंख्या पुन्हा गरिबीच्या खाईत ढकलली जाईल.”
भारतासह जगभरात इंधनाच्या वाढत्या किंमती, महागाई आणि ऊर्जा टंचाईबाबत चिंता वाढत असताना पंतप्रधानांचा हा इशारा समोर आला आहे. युरोप दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी, हैदराबादमधील एका कार्यक्रमात मोदी यांनी भारतीयांना स्वेच्छेने काटकसरीचे उपाय स्वीकारण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करता येईल.
त्यांनी नागरिकांना पुढील उपाययोजना करण्याचे आवाहन केले :
- शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारा
- अनावश्यक परदेश दौरे आणि सोन्याची खरेदी टाळा
- इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतूक आणि कारपूलिंगचा वापर करा
- शेतीमध्ये खतांचा अतिवापर टाळा
पंतप्रधानांनी इंधन आणि परकीय चलन बचत करणे हे देशभक्तीचे कार्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “परकीय चलनाची बचत आणि युद्धजन्य संकटांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक तेवढ्याच गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” या जागतिक संकटाचा परिणाम आता भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशावरही दिसू लागला आहे. शुक्रवारी (१५ मे) सरकारी तेल कंपन्या Indian Oil Corporation (IOC), Bharat Petroleum (BPCL) आणि Hindustan Petroleum (HPCL) यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ केली. जवळपास चार वर्षांनंतरची ही पहिली मोठी दरवाढ आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९७.७७ रुपये, तर डिझेलचा दर ९०.६७ रुपये झाला आहे.
सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (भाजप) ने या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले की, भारत सरकारने दोन महिन्यांहून अधिक काळ ग्राहकांना जागतिक तेल संकटाच्या धक्क्यापासून वाचवले आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पश्चिम आशियातील तणाव वाढल्यानंतर सुमारे ७६ दिवस वाढीव कच्च्या तेलाच्या किंमतींचा भार स्वतः उचलला.
हे ही वाचा:
२०,००० टन गॅस घेऊन ‘सिमी’ जहाज गुजरातच्या कांडला बंदरात दाखल
भारतातून पहिल्यांदाच १८२ कोटींचे ‘जिहादी ड्रग’ जप्त
प्रकरणांच्या सुनावणीत येणार वेग; सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली
बकरी ईदनिमित्त निवासी भागात उघड्यावरील कत्तलीला विरोध
विरोधी पक्षांनी इंधन दरवाढ आणि पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाच्या वेळेवर टीका केली आहे. त्यांच्या मते, महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांमुळे तेलाच्या किंमती जाणीवपूर्वक रोखून ठेवण्यात आल्या होत्या. सध्याच्या ऊर्जा संकटाचा परिणाम संपूर्ण आशियावर होत आहे. फिलिपाईन्सने राष्ट्रीय ऊर्जा आपत्काल जाहीर केला आहे, त दक्षिण कोरियाने नागरिकांना कमी वेळ अंघोळ करण्याचा आणि दिवसाच फोन चार्ज करण्याचा सल्ला दिला आहे. जपानने आपला आपत्कालीन तेलसाठा बाजारात उपलब्ध करून दिला आहे.







