मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची गरज भागवण्यासाठी काहीसा दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेले ‘सिमी’ हे एलपीजी मालवाहू जहाज रविवारी सकाळी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील कांडला बंदरात यशस्वीरित्या दाखल झाले. या जहाजाने १३ मे २०२६ रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास केला होता. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या ७५ दिवसांहून अधिक काळापासून हा सागरी मार्ग पूर्णपणे बंद आणि असुरक्षित राहिला आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) कतारच्या रास लाफान टर्मिनलकडून खरेदी केलेल्या या जहाजात अंदाजे २०,००० टन द्रवरूप प्रोपेन आणि ब्युटेन (स्वयंपाकाचा गॅस) आहे. जहाजावरील सर्व २१ परदेशी कर्मचारी सुरक्षित आहेत. ओमानच्या आखातात अमेरिकेची नाकेबंदी आणि इराणच्या नौदलाची कडक निगराणी असताना, जहाज सुरक्षितपणे रिकामे करण्यासाठी अत्याधुनिक सामरिक हालचालींची आवश्यकता होती.
बुधवारी युद्धक्षेत्रातून जात असताना, जहाजाने रडारच्या नजरेतून सुटण्यासाठी आपले ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम (AIS) ट्रान्सपॉन्डर्स तात्पुरते बंद केले. या युक्तीमुळे जहाजाला रडार-निरीक्षित युद्धक्षेत्र टाळून, इराणच्या लारक बेटाच्या पूर्वेकडील भागात सुरक्षितपणे पुन्हा प्रवेश करणे शक्य झाले.
भारतीय सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, ही संपूर्ण मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि जहाजाचे कोणत्याही चकमकीपासून संरक्षण करण्यासाठी सरकारमधील चार मंत्रालयांमध्ये उत्कृष्ट समन्वय दिसून आला. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, मुकेश मंगल यांनी याला दुजोरा देत सांगितले की, “डीजी शिपिंग, परराष्ट्र मंत्रालय (MEA), संरक्षण मंत्रालय (MoD) आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय यांच्यात चोवीस तास अखंड समन्वय असल्यामुळे या जहाजाचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित झाला.”
हे ही वाचा:
भारतातून पहिल्यांदाच १८२ कोटींचे ‘जिहादी ड्रग’ जप्त
प्रकरणांच्या सुनावणीत येणार वेग; सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली
बकरी ईदनिमित्त निवासी भागात उघड्यावरील कत्तलीला विरोध
बंगालच्या अभ्यासक्रमातून सिंगूर, नंदिग्राम आंदोलनांशी संबंधित प्रकरणे वगळणार?
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून भारताकडे येणारा हा धोकादायक सागरी अडथळा पार करणारे ‘सिमी’ हे १३ वे जहाज आहे. त्याच्या पाठोपाठ व्हिएतनामी ध्वज असलेले दुसरे एलपीजी टँकर, ‘एनव्ही सनशाईन’, ४६,४२७ टन इंधन घेऊन न्यू मंगलोर बंदराकडे जात आहे. स्वयंपाकाच्या गॅसची ही खेप भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेसाठी जीवनरेखेसारखी आहे. गेल्या ७५ दिवसांपासून पश्चिम आशियातील सागरी मार्गामध्ये व्यत्यय आल्यामुळे भारताचा एकूण कच्च्या तेलाचा आणि व्यावसायिक गॅसचा साठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. भारताचा राष्ट्रीय साठा तब्बल १५ टक्क्यांनी कमी झाला आहे. कमोडिटी विश्लेषण कंपनी केप्लरच्या मते, युद्ध सुरू होण्यापूर्वी भारताकडे १०७ दशलक्ष बॅरल कच्चे तेल उपलब्ध होते, जे आता कमी होऊन ९१ दशलक्ष बॅरल झाले आहे.







