प्रभासच्या आगामी ‘फौजी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे शूटिंग सुरू असताना त्यांना विषारी कीटक किंवा कोळ्याने चावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सुरुवातीला किरकोळ वाटलेली ही घटना काही तासांत गंभीर वळणावर गेली. त्यांच्या उजव्या पायातील संसर्ग वेगाने वाढत गुडघ्यापर्यंत पोहोचल्याने त्यांना तातडीने कोलकात्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले असले, तरी संसर्ग गंभीर असल्याने सतत वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंग संपल्यानंतर राजेश शर्मा तंत्रज्ञांशी गप्पा मारत असताना दाट झुडपांच्या परिसरात त्यांना एखाद्या विषारी कीटकाने चावले. त्यावेळी त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र अवघ्या सहा तासांत त्यांच्या उजव्या पायात तीव्र वेदना सुरू झाल्या, त्यानंतर ताप, अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. कोलकात्यात पोहोचताच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
हे ही वाचा:
घसरणीनंतर बाजाराची दमदार मुसंडी; सेन्सेक्स २३८ अंकांनी वधारला
बीडमध्ये ऊसतोड मजुराचे अपहरण करून चार दिवस अमानुष छळ
दहशतवादी तळांवरील स्फोटांचे पडसाद जगभर उमटले!
गांगुलीचा गौरव, सचिनचा अभिमान!
रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे परिस्थिती गांभीर्याने हाताळली जात आहे. रक्तात गुठळी तयार होण्याचा धोका असल्याने आणि ती फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशीही डॉक्टरांनी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संस्थेने ‘फौजी’च्या निर्मात्यांना लक्ष्य करत या घटनेची उच्चस्तरीय आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. शूटिंगच्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा होत्या का, कलाकाराची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने हैदराबादमधील मोठ्या रुग्णालयात का दाखल करण्यात आले नाही, तसेच सुरक्षा आणि आरोग्यविषयक नियमांचे पालन झाले होते का, असे अनेक प्रश्न AICWAने उपस्थित केले आहेत.
याशिवाय, निर्मात्यांनी राजेश शर्मा यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलावा आणि ते पूर्णपणे बरे होईपर्यंत सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही AICWAने केली आहे. या घटनेमुळे चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कडक सुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था अनिवार्य करण्याची गरज अधोरेखित होत आहे.







