29 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरराजकारण"काँग्रेसला आणखी ३० वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागेल"

“काँग्रेसला आणखी ३० वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागेल”

अमित शाहांचा राहुल गांधींवर पुण्यातून हल्लाबोल

Google News Follow

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील कार्यक्रमातून काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करून राहुल गांधी यांना सत्तेवर येता येणार नाही, असे शाह यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाला गेल्या काही वर्षांत सातत्याने निवडणुकीतील पराभवाचा सामना करावा लागत असून, त्यातूनच पक्षाकडून सरकार आणि देशाच्या नेतृत्वावर टीका केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी परदेश दौरे करण्याऐवजी भारतातील गावागावांत जाऊन नागरिकांच्या समस्या समजून घ्याव्यात, असा सल्ला शाह यांनी दिला.

हैदराबाद येथे १३ आणि १४ नोव्हेंबरला आयोजित भारत समिटमध्ये राहुल गांधी सहभागी झाले होते. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी भारत, लोकशाही संस्था आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विकासकामांबाबत केलेल्या वक्तव्यांवर शाह यांनी आक्षेप घेतला. भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब करण्याचा प्रयत्न केल्याने राजकीय फायदा होणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने आपल्या राजकीय धोरणाचा फेरविचार करावा, अन्यथा पक्षाला आणखी ३० वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी शाह यांनी केंद्र सरकारच्या १२ वर्षांतील कामगिरीचाही उल्लेख केला. कृषी, उद्योग, अंतराळ संशोधन, स्टार्टअप क्षेत्र, रेल्वे आधुनिकीकरण, विमानतळांची संख्या वाढवणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अशा विविध क्षेत्रांत सरकारने काम केल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसच्या २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या सत्ताकाळात १२ लाख कोटी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही शाह यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पुण्यातील कार्यक्रमात सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहितीही अमित शाह यांनी दिली. स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना, सहकारी साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन आणि राष्ट्रीय अवजड अभियांत्रिकी सहकारी लिमिटेडच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा यावर त्यांनी भाष्य केले. या प्रकल्पात साखर कारखान्यांसाठी यंत्रसामग्री, इथेनॉल आणि सीबीजी निर्मिती तसेच कंटेनर उत्पादनासारखे उद्योग विकसित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी खासगी टॅक्सी कंपन्यांना पर्याय म्हणून चालकांच्या सहकारी तत्त्वावर आधारित ‘भारत टॅक्सी’ संकल्पनेचाही उल्लेख केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा