मुंबई : सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांदरम्यान मुंबई पोलिसांच्या ‘१९३०’सायबर हेल्पलाइन’ने मोठे यश संपादन केले असून, जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत तब्बल १०१.३९ कोटी रुपयांची फसवणुकीची रक्कम होल्ड करून नागरिकांचे पैसे वाचवण्यात यश मिळवले आहे. गुन्हे शाखेच्या सायबर विभागाने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली.
मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेंतर्गत १७ मे २०२२ पासून ‘१९३०’ हेल्पलाइन’ कार्यरत आहे. शेअर ट्रेडिंग-इन्व्हेस्टमेंट फ्रॉड, डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन टास्क फ्रॉड, जॉब फ्रॉड, डेबिट-क्रेडिट कार्ड फसवणूक, फिशिंग आदी सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी या हेल्पलाइनवर नोंदवल्या जातात.
सायबर फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच संबंधित बँका, वॉलेट, मर्चंट आणि पेमेंट गेटवे यांच्याशी राष्ट्रीय स्तरावर समन्वय साधून फसवणुकीची रक्कम तातडीने होल्ड करण्याची प्रक्रिया राबवली जाते. यामुळे अनेक नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक टळली आहे.
हे ही वाचा
पासपोर्ट पडताळणीसाठी लाचेची मागणी
जनादेश बुलडोझरसाठीच होता, माय लॉर्ड
संदेशखालीत ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या तृणमूलच्या दोन महिला ताब्यात
इन्स्टाग्रामद्वारे दहशतवादी भरती करणाऱ्या हमराज शेखला सात वर्षांची शिक्षा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते १९ मे २०२६ या कालावधीत हेल्पलाइनवर २ लाख ५५ हजार ९२ कॉल्स प्राप्त झाले. त्यापैकी ३० हजार ३०२ प्रकरणांमध्ये फसवणुकीची रक्कम होल्ड करण्यात यश आले. एकूण फसवणुकीच्या रकमेपैकी २५.६८ टक्के रक्कम वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
तसेच मे २०२२ ते मे २०२६ या चार वर्षांच्या कालावधीत सायबर गुन्ह्यांमधील तब्बल ४९८.५७कोटी रुपये होल्ड करून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.
ही कारवाई मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त इरफान शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुवर्णा शिंदे तसेच १९३० हेल्पलाइन पथकाने केली.
दरम्यान, कोणत्याही प्रकारची आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीने १९३० हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.







