देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाला महत्त्वाचे वळण देत दिल्लीतील राऊस एव्हेन्यू फास्ट-ट्रॅक न्यायालयात १३ आरोपींविरुद्ध तब्बल २० हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात देशभर पसरलेल्या पेपरफुटी रॅकेटचा तपशील, शेकडो साक्षीदारांचे जबाब आणि शेकडो दस्तऐवजांचा समावेश करण्यात आला आहे.
सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र हे या प्रकरणातील आतापर्यंतचे सर्वात मोठे कायदेशीर पाऊल मानले जात आहे. आरोपपत्रात ३६० साक्षीदारांचे जबाब आणि ४२२ कागदपत्रांचा आधार घेण्यात आला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि फॉरेन्सिक तपास अहवालांचाही समावेश करण्यात आला आहे.
तपास यंत्रणेनुसार, आरोपींमध्ये परीक्षा प्रक्रियेशी संबंधित काही तज्ज्ञ, कोचिंग सेंटरचे संचालक, मध्यस्थ आणि पेपरफुटीच्या कटात सहभागी इतर व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावे नष्ट करणे, सार्वजनिक परीक्षांमध्ये गैरप्रकार करणे तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सीबीआयच्या तपासात प्रश्नपत्रिका गळतीचे संपूर्ण जाळे उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. त्यासाठी विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या दलाल, कोचिंग सेंटर आणि इतर संबंधितांच्या माध्यमातून समन्वय साधला गेला. तपासादरम्यान पेपरफुटीचा उगम, त्याचा प्रवास आणि त्याचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांपर्यंत पोहोचणारी संपूर्ण साखळी सीबीआयने शोधून काढल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानात पोलिस चौकीवर झालेल्या हल्ल्यात नऊ पोलिसांचा मृत्यू
जंतर-मंतर आंदोलन प्रकरणी बलप्रयोगाचे निकष स्पष्ट करण्याचे निर्देश
खाण व्यावसायिकाच्या नातेवाईकाकडून २८ कोटींची रोकड, १५ किलो सोने जप्त
“कर्तव्य निडरपणे बजावा, जबाबदारी माझी” CRPF महासंचालक जवानांच्या पाठीशी
दरम्यान, फास्ट-ट्रॅक न्यायालयाने सीबीआयला आरोपपत्रासोबत जोडलेल्या जवळपास २० हजार पानांच्या परिशिष्टांमधील सर्व कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी आणखी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. ही कागदपत्रे स्कॅन करून न्यायालयात दाखल केली जात असून, त्यानंतर प्रकरणाची पुढील सुनावणी ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारच्या आदेशानंतर सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. तपासादरम्यान अनेक राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले, संशयितांची चौकशी करण्यात आली आणि विविध डिजिटल उपकरणे, आर्थिक व्यवहार तसेच संवादाची माहिती तपासण्यात आली. या तपासातून देशव्यापी संघटित पेपरफुटी रॅकेटचे धागेदोरे समोर आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
