उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील खोडा परिसरात १७ वर्षीय हिंदू तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूर्य चौहान असे पीडिताचे नाव असून त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. २८ मे रोजी सायंकाळी नवनीत विहार कॉलनीत ही घटना घडली. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. उपचारादरम्यान २९ मे रोजी सूर्यचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरणात हत्येची कलमे जोडण्यात आली.
मृताचा भाऊ यश चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सूर्य हा त्याचे मित्र विक्की आणि आयुषसोबत घराजवळ फिरत होता. त्यावेळी त्याचा मित्र असद याने फोन करून त्याला गल्ली क्रमांक २ मध्ये बकरी ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमाला बोलावले. तक्रारीनुसार सूर्य आणि त्याचे मित्र तेथे पोहोचले असता असदसोबत नवाब, फरहान, आतिफ आणि सारिक हेही उपस्थित होते. कुटुंबीय आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी सूर्यला, “तू कधी बकरा कापताना पाहिलं आहेस का?” असा प्रश्न विचारला. त्यानंतर काही कारणावरून वाद झाला आणि सूर्यवर चाकूने हल्ला करण्यात आला.
तक्रारीनुसार, सूर्यच्या पोटावर पहिला वार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेतही त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुमारे २०० मीटरपर्यंत धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याला खाली पाडले आणि पुन्हा अनेक वेळा चाकूचे वार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच सूर्यची आई आणि भाऊ घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी सूर्यला प्रथम स्थानिक रुग्णालयात आणि नंतर नोएडातील सेक्टर-६२ येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान २९ मे रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला.
सुरुवातीला पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र युवकाचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप बदलून हत्या प्रकरणात रूपांतर करण्यात आले. इंदिरापूरमचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. मुख्य आरोपी असद सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींच्या भूमिकेची चौकशी केली जात असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
आशिया- प्रशांत महासागरावर कोणतेही राष्ट्र वर्चस्व गाजवू शकत नाही!
कर्नाटकात २० लाख बेकायदा बांगलादेशी?
लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यात ११ जण ठार
“ट्रम्प यांचे दावे म्हणजे सत्य आणि असत्याचे मिश्रण”
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक हिंदू संघटनांचे कार्यकर्ते खोडा परिसरात आणि स्थानिक पोलीस ठाण्यात जमा झाले असून सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी निष्पक्ष आणि सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले असून, तपासात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
