संसद भवनात घुसखोरीची घटना: भिंत ओलांडून गरुड गेटपर्यंत पोहोचलेला आरोपी अटकेत!

सुरक्षा यंत्रणा सतर्क

संसद भवनात घुसखोरीची घटना: भिंत ओलांडून गरुड गेटपर्यंत पोहोचलेला आरोपी अटकेत!

भारताच्या अत्यंत संरक्षित क्षेत्रांपैकी एक असलेल्या संसद भवनाच्या नवीन इमारतीत घुसखोरी झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. एका अनोळखी व्यक्तीने रेल भवनाच्या बाजूने झाडाचा आधार घेत भिंतीवरून उडी मारून संसद परिसरात प्रवेश केला. तो थेट गरुड गेटपर्यंत पोहोचला. सुदैवाने, परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ सावधपणा दाखवत त्या व्यक्तीला अटक केली.

सध्या संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे आणि हेतू जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. घटनेमुळे संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. सूत्रांनी सांगितले की, आरोपीची मानसिक स्थिती, घुसखोरीमागचा उद्देश आणि त्याच्याकडे कोणतेही संशयास्पद साहित्य होते का याचा तपास केला जात आहे.

संसद भवनासारख्या सर्वोच्च सुरक्षा क्षेत्रात घडलेली ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून, यानंतर सुरक्षा व्यवस्थेत आणखी कडक उपाययोजना करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

संसद भवनात ही घटना घडल्यामुळे संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या आहेत. केवळ भिंत आणि झाडाचा आधार घेत कोणी संसद परिसरात पोहोचू शकतो, यावरून सध्याच्या सुरक्षा उपाययोजनांमध्ये दुरुस्तीची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आधीही काही वेळा संसद परिसरात घुसखोरीचे किंवा आंदोलक घुसण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र नवीन इमारतीच्या कठोर सुरक्षाव्यवस्थेला चुकवून आता पोहोचण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे.

हे ही वाचा : 

“पंतप्रधानांचा दौरा: बिहारमध्ये १३,००० कोटींचे प्रकल्प, कोलकाता मेट्रोला नवे टप्पे”

“भारतावर दुप्पट कर लावण्याची अंतिम मुदत २७ ऑगस्टपर्यंतच; ट्रम्प वाढवणार नाहीत”

भारताची सेकंड-स्ट्राइक क्षमता मजबूत, ड्रोनविरोधी सुरक्षा विकसित करणे ही प्राथमिकता: ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

Syed Shahid Hakim: भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खेळाडू

या घटनेनंतर गृह मंत्रालय आणि संसद सुरक्षा यंत्रणेकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, संसद सुरक्षा समिती आणि दिल्ली पोलिसांकडून संयुक्त तपासाची शक्यता आहे. तसेच भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी संसद परिसरातील भिंती, झाडे, आणि सीसीटीव्ही कव्हरेज यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

Exit mobile version