जम्मू- काश्मीर पोलिसांनी मोठ्या दहशतवादी षडयंत्राचा कट उधळला असून दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या अनंतनाग येथील माजी सरकारी डॉक्टर आदिल अहमद राथेर याने सांगितलेल्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. हरियाणाच्या फरिदाबाद येथे ३०० किलो स्फोटके, AK-47 आणि दारूगोळा सापडला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
हरियाणातील फरिदाबादमध्ये जम्मू- काश्मीर पोलिसांनी एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि हत्यारं जप्त केली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरने खोली भाड्याने घेतली होती. पोलिसांनी त्याच्या घरातून सुमारे ३०० किलो स्फोटके, दोन AK-47 रायफल आणि ८४ जिवंत काडतुसे आणी केमिकल जप्त केलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने स्थानिक पोलिसांसह डॉक्टरच्या घरावर छापा टाकला.
माहितीनुसार, ही कारवाई अन्सार गजवत-उल-हिंद (AGH) या दहशतवादी संघटनेच्या चौकशीचा एक भाग आहे. तीन डॉक्टर या संघटनेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले. त्यापैकी दोन डॉक्टर्स आदिल अहमद राथेर (अनंतनाग रहिवासी) आणि मुज़म्मिल शकील (पुलवामा रहिवासी) या दोघांना सहारणपुर आणि फरीदाबाद येथून अटक करण्यात आली. तर तिसरा डॉक्टर अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स आणि हत्यारे फरीदाबापर्यंत पोहोचली कशी आणि डॉक्टरांची नेमकी भूमिका काय होती याचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
हे ही वाचा:
चीनमध्ये डॉक्टर झालेला कट्टर इस्लामी भारतीयांवर करणार होता विषप्रयोग
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाज पठण; भाजपाची सिद्धरामय्या सरकारवर टीका
अमेरिकन व्यक्तीला २,००० डॉलर्स मिळणार!
मुस्लिम, ख्रिश्चनांसाठी संघाचे दरवाजे उघडे, पण भारतमातेचे पुत्र म्हणून या!
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग मेडिकल कॉलेज येथील आदिल अहमद राथेर याच्या वैयक्तिक लॉकरमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आली होती. आदिल हा महाविद्यालयात वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम करत होता, पण त्याने २४ ऑक्टोबर २०२४ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. आदिल आणि त्याचे सहकारी डॉक्टर्स हे अन्सार गजवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचे नेटवर्क पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करत होते असा तपास यंत्रणांचा संशय आहे.
