बेंगळुरूत बँक मॅनेजरनेच लुटले सोने

जुगाराच्या नादापायी असिस्टंट मॅनेजरचे टोकाचे पाऊल

बेंगळुरूत बँक मॅनेजरनेच लुटले सोने

कर्नाटकातील बेंगळुरू येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंडियन बँक च्या गिरिनगर परिसरातील शाखेत कार्यरत असलेल्या असिस्टंट मॅनेजरला ग्राहकांच्या लॉकरमधून तब्बल २.७ किलो सोने चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे बँकिंग सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी गिरिनगर शाखेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत त्याने ग्राहकांच्या लॉकरमध्ये अनधिकृत प्रवेश केला. सुरुवातीला कमी प्रमाणात सोने काढून संशय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कालांतराने मोठ्या प्रमाणात दागिने गायब झाल्याचे तपासात समोर आले.
हे ही वाचा:
सकाळच्या योगाभ्यासाला आलंय महत्त्व

राम मंदिराचे वैभव सातासमुद्रापार

पाकिस्तानचा टीम इंडियाने केला करेक्ट कार्यक्रम

संरक्षण आधुनिकीकरणाला मोठी चालना

ही बाब जानेवारीच्या सुरुवातीला उघड झाली. काही ग्राहकांनी आपल्या लॉकरमधील दागिने तपासले असता सोने कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही लॉकरमधून तर संपूर्ण पॅकेट्सच गायब असल्याचे आढळले. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर बँकेने अंतर्गत चौकशी सुरू केली. त्यानंतर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.

तपासादरम्यान सुमारे २,७८३ ग्रॅम म्हणजेच २.७ किलो सोने गायब असल्याचे स्पष्ट झाले. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत सुमारे ४ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चोरी केलेले सोने विविध खासगी वित्तीय संस्थांकडे गहाण ठेवले होते. त्या बदल्यात मिळालेली रक्कम ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीसाठी वापरल्याची त्याने कबुली दिली आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून काही प्रमाणात सोने जप्त केले आहे. उर्वरित सोन्याचा शोध सुरू असून संबंधित वित्तीय संस्थांकडूनही माहिती मागविण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास केला जात आहे.

या घटनेमुळे बँक लॉकर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्राहकांच्या मालमत्तेची सुरक्षितता ही बँकेची प्राथमिक जबाबदारी असताना अंतर्गत अधिकाऱ्याकडूनच गैरव्यवहार झाल्याने विश्वासाला मोठा धक्का बसला आहे. बँकेकडून सुरक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्याची तयारी दर्शविण्यात आली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना वेळोवेळी आपल्या लॉकरमधील वस्तूंची पडताळणी करण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणामुळे बँकिंग व्यवस्थेतील अंतर्गत नियंत्रण अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Exit mobile version