राज्याच्या मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणांनी प्रशासनाच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला लाच घेताना अटक झाल्याची घटना ताजी असतानाच आता अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा प्रलंबित निधी मंजूर करून देण्यासाठी विलास लाड याने संबंधित व्यक्तीकडे तब्बल ६ लाख ३७ हजार ५०० रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रार दाखल होताच एसीबीने पडताळणी करून नियोजनबद्ध कारवाई केली.
ठरल्याप्रमाणे लाड खारघर परिसरात लाच स्वीकारण्यासाठी आला असता, एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सतत उघड होत असलेल्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा:
ऑनलाइन गेमिंगच्या आड दहशतवादाचा सापळा?
ट्रॉफीचोर पाकड्या मोहसीनचे हसीन सपने!
पडद्यामागचं मार्गदर्शन; मैदानावर डेविडचा जलवा
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेविरोधात मविआचे गोविंदराव मोकाटे
दरम्यान, आरोपीची सखोल चौकशी सुरू असून त्याच्या मालमत्तेचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातून आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, आर्थिक वर्षअखेरीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात एसीबीने मंत्रालयातील भ्रष्टाचाराविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या होत्या. एप्रिलच्या सुरुवातीलाच झालेल्या या कारवाईमुळे मंत्रालयातील गैरप्रकारांवर एसीबीने लक्ष केंद्रीत ठेवले असल्याचे स्पष्ट होत आहे.
