आंध्रमध्ये पक्षाच्या समर्थकाला ताफ्याच्या गाडीखाली चिरडल्यानंतर जगन रेड्डींविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांकडून तपास सुरु, मुख्यमंत्री नायडू यांच्याकडून घटनेचा निषेध 

आंध्रमध्ये पक्षाच्या समर्थकाला ताफ्याच्या गाडीखाली चिरडल्यानंतर जगन रेड्डींविरुद्ध गुन्हा दाखल

गुंटूर जिल्ह्याच्या अलिकडच्या दौऱ्यादरम्यान जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्याखाली पक्षाच्या एका कार्यकर्त्याला चिरडल्याप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांनी माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, माजी खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी, माजी मंत्री विदादला रजनी आणि इतर अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुंटूर जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी जगन मोहन रेड्डी यांनी ताडेपल्ली ते सत्तेनापल्ली असा दौरा केला होता. माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत जाण्यासाठी फक्त तीन गाड्यांना परवानगी देण्यात आली होती. जेव्हा हा ताफा नल्लापाडू पोलिस स्टेशन हद्दीतील एटुकुरु बायपासजवळील अंजनेय स्वामी पुतळ्याजवळ पोहोचला तेव्हा एका व्यक्तीला रस्ता अपघातात गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली. पीडितेचे नाव ५३ वर्षीय चिली सिंघैया असे आहे. दुर्घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंनुसार, सिंगैया यांनी ताफ्यावर फुले वर्षाव करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते घसरले आणि चालत्या गाडीखाली पडले. जगन मोहन रेड्डी ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची चाके सिंगैया यांच्या मानेवरून गेल्याचे सांगितले जात आहे. गाडी थांबली नाही आणि कोणीही त्यांना मदत केली नाही.

या घटनेनंतर स्थानिकांनी जखमी सिंगय्याला गुंटूर सरकारी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, गुंटूरचे एसपी सतीश कुमार यांनी रविवारी पुष्टी केली की जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्यातील एका वाहनाने सिंगय्याला चिरडल्याचे ठोस पुरावे पोलिसांकडे आहेत. एसपींनी असेही म्हटले की अपघात होऊनही ताफा थांबला नाही, ज्यामुळे निष्काळजीपणाचे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पीडित व्यक्तीच्या पत्नी चिली लौरधू मेरी यांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम १०६(१) अंतर्गत दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात जगन मोहन रेड्डी, त्यांचे चालक रमणा रेड्डी, माजी खासदार वाय.व्ही. सुब्बा रेड्डी, माजी मंत्री विद्दला रजनी आणि माजी मंत्री पेरणी नानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक रमणा रेड्डी यांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.

एवढा मोठा अपघात होऊनही काफिला का थांबला नाही? आणि अपघात रोखण्यासाठी काही प्रयत्न केले गेले का?, याचा तपास आता पोलिस करत आहेत. या घटनेनंतर वायएसआरसीपी आणि विरोधी पक्षांच्या स्थानिक समर्थकांमध्ये संताप दिसून येत आहे. या अपघातामुळे सुरक्षेच्या मानकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि येत्या काही दिवसांत त्यासंबंधी अधिक माहिती समोर येऊ शकते. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा निषेध केला आणि सवाल केला कि माजी मुख्यमंत्री मृतांच्या कुटुंबाला का भेटले नाहीत किंवा मृत्यूबद्दल विचारपूस का केली नाही.

Exit mobile version