विधवांना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्या नराधमाला बेड्या

२५ पेक्षा जास्त महिलांची फसवणूक

विधवांना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्या नराधमाला बेड्या

वराच्या शोधात असलेल्या विधवा, घटस्फोटित महिलांना लक्ष्य करून त्यांच्याशी लग्न करायचे आणि त्यानंतर दागिने व रोख रकमेचा अपहार करून पसार व्हायचे, अशा एका धक्कादायक वैवाहिक फसवणूक रॅकेटचा मीरा-भाईंदर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अनुजकुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी (४७) असे या मुख्य आरोपीचे नाव असून, त्याने देशभरात २५ हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे.

आरोपी त्रिवेदी हा वर्तमानपत्रातील वैवाहिक जाहिरातींमधून विधवा, घटस्फोटित आणि एकट्या राहणाऱ्या महिलांना लक्ष्य करायचा. ‘अजय अग्रवाल’, ‘अजय संतोष सिंग’ आणि ‘जयप्रकाश गुप्ता’ अशा अनेक बनावट नावांचा वापर करून तो महिलांचा विश्वास संपादन करायचा. स्वतःला एक यशस्वी व्यावसायिक असल्याचे भासवून तो महिलांशी लग्न करायचा आणि त्यानंतर विविध बहाण्यांनी त्यांच्याकडून मोठी रक्कम आणि दागिने उकळून पसार व्हायचा.

हे रॅकेट तेव्हा उघडकीस आले, जेव्हा मीरा रोड येथील एका पीडित महिलेने नया नगर पोलिसांकडे तक्रार केली. मार्च २०१९ मध्ये एका जाहिरातीला प्रतिसाद देत पीडितेने आरोपीशी लग्न केले. लग्नानंतर त्रिवेदीने तिला लखनौमध्ये मालमत्ता घेण्याचे आमिष दाखवून तिचे घर विकायला लावले आणि कुटुंबाकडून ८२ लाख रुपये उकळले.

हे ही वाचा:

ऑपरेशन टायगर फत्ते! ठाकरेंचे सहा खासदार शिवसेनेत

‘बिनपाण्या’चा रोमांस वान्स-मुनीर यांचे पती, पत्नी और वो…

सामाजिक कार्यकर्त्या नाझिया इलाही खान यांना गळा चिरण्याची धमकी

झेल सुटले, सामना हातातून गेला!

त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये दिल्लीला नेऊन तिचे ३३ तोळे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने बळकावून तो फरार झाला. या प्रकरणात पीडित कुटुंबाची तब्बल ९७ लाख रुपयांची फसवणूक झाली.

तपासात असे समोर आले आहे की, फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून आरोपीने लखनौमध्ये ५ कोटी रुपयांचा आलिशान बंगला बांधला होता आणि बीएमडब्ल्यूसारखी महागडी गाडीही खरेदी केली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने त्रिवेदीला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून अटक केली. त्याच्याकडून बनावट ओळखपत्रे, मोबाईल आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

आरोपी २०१२ पासून हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. अमरावतीमध्येही त्याने एका महिलेची २५ लाखांची फसवणूक केल्याची नोंद आहे. या गुन्हेगारी कृत्यात वडिलांना मदत केल्याप्रकरणी त्याचा मुलगा अविराल उर्फ प्रखर त्रिवेदी (२७) यालाही पोलिसांनी सहआरोपी म्हणून अटक केली आहे.

Exit mobile version