लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून तरुणाला चाकूने मारले; आरोपीला अटक

लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून तरुणाला चाकूने मारले; आरोपीला अटक

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये सोमवारी रात्री उशिरा एका २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने मयंक लोहार या तरुणाच्या पोटात चाकू खुपसून त्याची हत्या केली. या घटनेमुळे मुंबईच्या लोकल प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान या खून प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्णाला पोलिसांनी अटक केली आहे. हा ३० वर्षीय आरोपीी गुन्ह्यानंतर फरार झाला होता आणि त्याचा शोध घेण्यासाठी ६ पथके तैनात करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपीच्या वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधून मुलगा कुठे लपला आहे याची माहिती दिली. या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुर्ला परिसरात सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याची कसून चौकशी करण्यात येत असून खुनामागील संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सदर खुनी व्यक्ती सीसीटीव्हीमधून समोर आला आहे. खून केल्यानंतर तो चालत जात असल्याचे सीसीटीव्हीत समोर आले आहे.

मृत मयंक लोहार हा विरारचा रहिवासी असून, तो अंधेरीतील एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून कार्यरत होता. सोमवारी रात्री कामावरून घरी परतताना तो अंधेरी स्थानकातून चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये चढला होता. त्याच डब्यात आरोपीही प्रवास करत होता. दरम्यान, जोरदार पावसामुळे मयंकने डब्याचा दरवाजा बंद करण्यास सांगितले असता, आरोपीसोबत त्याचे बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने रागाच्या भरात मयंकच्या पोटात चाकूने वार केले.

हे ही वाचा:

अदानींचा ऊर्जा क्षेत्रात मेगा विस्तार

विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूरच्या ‘कमांड’वर नियुक्ती

इराणमध्ये परिस्थिती सुधारतेय, पण सावध राहा!

होर्मुझ खुला, पण गरज पडल्यास नाकेबंदीसाठी जहाजे सज्ज ठेवणार

ट्रेन बोरीवली स्थानकात पोहोचण्यापूर्वीच आरोपीने चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्म क्रमांक ६ जवळ उडी मारली आणि तिथून पळ काढला होता. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत.

घटनाक्रम

रात्री १०:०५: चर्चगेटवरून ट्रेन सुटली.
रात्री १०:४२:अंधेरी स्थानकात मयंक ट्रेनमध्ये चढला.
अंधेरी ते बोरीवली दरम्यान: दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला आणि आरोपीने मयंकवर हल्ला केला.
रात्री ११:०४: बोरीवली स्थानकात ट्रेन पोहोचली; आरोपी पसार झाला.
रात्री ११:०७ – ११:२२: रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मयंकला तात्काळ बोरीवली स्थानकातील इमर्जन्सी मेडिकल रूममध्ये हलवण्यात आले.
रात्री ११:४२: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मयंकला रुग्णवाहिकेतून कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले.
रात्री ११:५२: रुग्णालय गाठले, मात्र उपचारादरम्यान मयंकचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या वर्षातील दुसरी घटना

पश्चिम रेल्वे मार्गावर या वर्षातील ही दुसरी हत्येची घटना आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात विलेपार्ले येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापक आलोक सिंग यांची मालाड स्थानकात ट्रेनमधून उतरताना झालेल्या वादातून हत्या करण्यात आली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नोकरी-व्यवसायासाठी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version