इराणमधील सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने बुधवारी (२४ जून) नवी प्रवास सूचना जारी करत भारतीय नागरिकांना पुढील आदेश मिळेपर्यंत इराणमधील सर्व अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत असली, तरी परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नसल्याने भारतीयांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.
दूतावासाने जारी केलेल्या सूचनेत इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना तसेच अपरिहार्य कारणांमुळे इराणला प्रवास करणाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अलीकडील काही सकारात्मक घडामोडी आणि परिस्थितीतील सुधारणा लक्षात घेता धोका काही प्रमाणात कमी झाल्याचे संकेत असले, तरी नागरिकांनी कोणतीही निष्काळजीपणा करू नये, असे दूतावासाने म्हटले आहे.
दूतावासाने भारतीयांना स्थानिक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी केवळ विश्वासार्ह माध्यमे आणि अधिकृत स्रोतांमधून माहिती मिळवावी तसेच स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी जारी करण्यात आलेल्या काही सूचनांमध्ये भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, नव्या सूचनेत असा कोणताही सल्ला देण्यात आलेला नाही. त्यामुळे परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे संकेत मिळत असले, तरी दूतावासाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे.
दरम्यान, इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी तसेच नव्याने इराणमध्ये दाखल होणाऱ्यांनी आपली माहिती भारतीय दूतावासाकडे नोंदवून ठेवावी, असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी दूतावासाने विशेष हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशात १०० हून अधिक कोचिंग सेंटर्स सील; खान सरांचे सेंटरही बंद
बँक ऑफ इंडियाने नीरव मोदीविरुद्धचा १०० कोटींचा खटला जिंकला
मान्सूनची दमदार हजेरी; मुंबईत २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद
ही सूचना अशा वेळी जारी करण्यात आली आहे, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंधांमध्ये नव्याने संवाद सुरू झाला आहे. दोन्ही देश युद्ध औपचारिकपणे समाप्त करण्यासाठी आणि इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भातील वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. मात्र, या चर्चांबाबत दोन्ही देशांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने काही महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, इराणने हे दावे फेटाळून लावत अमेरिकेच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राजनैतिक पातळीवर संवाद सुरू असला तरी परिस्थिती अद्याप संवेदनशील असल्याचे मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने सावध भूमिका घेत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार पुढील सूचना जारी केल्या जातील, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.







