कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना एका तरुणीने आपल्या आई-वडिलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्षिता नावाच्या २१ वर्षीय तरुणीचे लग्न २४ जून रोजी होणार होते. मात्र लग्नाच्या काही दिवस आधी तिचे खासगी फोटो आणि वैयक्तिक संदेश होणाऱ्या पतीकडे पाठवण्यात आल्याने तिच्या आयुष्यात मोठे वादळ निर्माण झाले. या प्रकारामुळे ती आणि तिचे कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, उल्लास गौडा नावाच्या तरुणाने रक्षिताचे काही खासगी फोटो आणि संदेश वरपक्षाकडे पाठवले होते. या घटनेनंतर लग्नाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढला. समाजात होणारी बदनामी, नातेसंबंधांवर आलेले संकट आणि सततचा मानसिक छळ यामुळे रक्षिता पूर्णपणे खचून गेली होती. या धक्क्यातून तिचे आई-वडीलही सावरू शकले नाहीत.
हे ही वाचा:
जमीन बळकावल्या प्रकरणी माजी तृणमूल आमदारासह मुलीला नोटीस
पद्म पुरस्काराने गौरविलेल्या मणी यांना हिंदू दहशतवादाच्या षडयंत्रात गोवले गेले!
कोलकात्यात बांधकामाधीन कारखान्याचे शेड कोसळून १४ कामगार जखमी
मंगळवारी रक्षिता, तिचे वडील शिवण्णा आणि आई नगरत्ना हे तिघेही त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये कुटुंबाने होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून लग्नासाठी सजलेले घर काही तासांतच शोकमग्न झाले.
तपासादरम्यान आरोपी उल्लास गौडा याने एकतर्फी प्रेमातून रक्षिताचा पाठलाग केल्याचे आणि तिची बदनामी करण्याच्या उद्देशाने फोटो व संदेश व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे तरुणी आणि तिच्या कुटुंबावर असह्य मानसिक दबाव निर्माण झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ करणे आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
