टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघे ताब्यात

रविवारी, २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली

टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघे ताब्यात

देशभरात नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाही फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रविवारी, २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे.

भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड हॉटेलमध्ये टीईटी पेपरफुटीशी संबंधित संशयित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र, संशयित तेथे आढळून न आल्याने पुढील तपास करत सहारा विमानतळ परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्यांच्या ताब्यात टीईटी परीक्षेतील प्रश्न आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर आरोपींना भिवंडीत आणून कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

पेपरफुटीच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणातच घेण्यात यावी, यासाठी सखोल चौकशी आवश्यक असल्याचे परिषदेने स्पष्ट केले. नव्या परीक्षेची तारीख आणि इतर माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

टीईटी परीक्षेचा पेपर फुटला; शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली

“पत्रकारितेचे स्वातंत्र्य म्हणजे नागरिकांना छळण्याचा परवाना नाही”

घुसखोरीच्या प्रयत्नात असलेला पाकव्याप्त काश्मीरातील २६ वर्षीय तरुण ताब्यात

पुढील वर्षाच्या प्रारंभी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार?

टीईटी परीक्षा पुढे ढकलली असली तरी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. राज्यातील ६ लाख १२८ उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी दिली. येत्या दोन ते तीन दिवसांत नव्या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल. त्यानंतर राज्यातील ३७ शहरांतील १,०२८ परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

Exit mobile version