भारत आणि सेशेल्स यांच्यातील मैत्री ही केवळ राजनैतिक संबंधांपुरती मर्यादित नसून ती शतकानुशतकांच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी नात्याने अधिक घट्ट विणली गेली आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सच्या संसदेला संबोधित करताना दिला. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी गरबा, समोसे, चटणी आणि ‘मौत्या’ या पारंपरिक लोकनृत्याचा उल्लेख करत भारत आणि सेशेल्स यांच्यातील सांस्कृतिक नाळ किती घट्ट आहे, हे अधोरेखित केले.
“हिंद महासागर आपल्याला विभक्त करत नाही, तर एकमेकांशी जोडतो,” असे सांगत नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांतील विश्वास, सहकार्य आणि परस्पर आदराचे नाते अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. सेशेल्सच्या विविधतेतील ऐक्याच्या संस्कृतीचे कौतुक करत त्यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्या देशाच्या विकासात दिलेल्या मोलाच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. भारतातून गेलेल्या अनेक पिढ्यांनी तेथील समाजजीवन, व्यापार आणि संस्कृती समृद्ध केल्यामुळे दोन्ही देशांचे संबंध आजही आत्मीयतेने जोडलेले असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
रिव्हर्स घेण्याची चूक ठरली जीवघेणी
पाकिस्तानने आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा, भारताकडून कडक समज
पाकिस्तानचे मेजर इक्बाल झोपलेत काय?
चेस-जंगूची विक्रमी भागीदारी! १४९ वर्षांचा इतिहास बदलला
सागरी सुरक्षेचा मुद्दा मांडताना नरेंद्र मोदी म्हणाले की, एका देशाची सुरक्षा दुसऱ्या देशाच्या सुरक्षेशी जोडलेली आहे. हिंद महासागर क्षेत्रात दहशतवाद, समुद्री चाचेगिरी, अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदा मासेमारी यांसारख्या वाढत्या धोक्यांना तोंड देण्यासाठी भारत आणि सेशेल्स यांनी एकत्रितपणे काम करणे अत्यावश्यक आहे. या संपूर्ण प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी भारत कायम सेशेल्सच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
इतिहासाचा दाखला देताना नरेंद्र मोदी यांनी १९७६ मध्ये सेशेल्सला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळी भारतीय नौदलाची ‘आयएनएस निलगिरी’ ही युद्धनौका पोर्ट व्हिक्टोरियामध्ये उपस्थित होती, याची आठवण करून दिली. आज, स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘आयएनएस इक्षाक’ आणि ‘आयएनएस तरकश’ या भारतीय नौदलाच्या युद्धनौका सेशेल्समध्ये उपस्थित असून, भारताची मैत्री आणि सहकार्याची परंपरा पाच दशकांनंतरही तितक्याच ताकदीने सुरू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी भारताच्या ‘महासागर’ (म्युच्युअल अँड होलिस्टिक अॅडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रीजन्स) या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचाही उल्लेख केला. हिंद महासागर क्षेत्राला शांत, सुरक्षित, समृद्ध आणि सर्वसमावेशक विकासाचा मार्ग दाखवण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांच्या या भाषणातून भारत-सेशेल्स संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचा स्पष्ट संदेश मिळाला. सांस्कृतिक जिव्हाळा, ऐतिहासिक विश्वास आणि सामरिक सहकार्य या त्रिसूत्रीच्या बळावर दोन्ही देशांची मैत्री भविष्यात आणखी भक्कम होणार असल्याचे या भाषणातून अधोरेखित झाले.







