अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता बळावली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत देत भारत- अमेरिका संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांदरम्यान व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि इंडो-पॅसिफिकमधील सहकार्य वाढत असताना हा संभाव्य दौरा द्विपक्षीय संबंधांना नवे बळ देणारा ठरू शकतो.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रुबिओ यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या भारत भेटीसाठी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारताला भेट देतील, अशी आमची अपेक्षा आहे. भारत हा अमेरिकेचा अत्यंत विश्वासार्ह आणि महत्त्वाचा भागीदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील घनिष्ठ संबंधांमुळे दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ झाले आहे,” असे त्यांनी नमूद केले.
हा दौरा निश्चित झाल्यास, फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमानंतर ट्रम्प यांची ही पहिली भारत भेट असेल. तसेच दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा ठरेल. काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये झालेल्या जी-७ परिषदेदरम्यान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात प्रत्यक्ष भेट झाली होती. या भेटीनंतर दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
मार्को रुबिओ यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतही आशावाद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चा अंतिम टप्प्यात असून, दोन्ही देश अनेक मुद्द्यांवर एकमताच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हा करार झाल्यास व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये आयात शुल्कासह काही व्यापारी मुद्द्यांवर अद्याप चर्चा सुरू असली, तरी परस्पर हित जपत तोडगा काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असल्याचेही रुबिओ यांनी स्पष्ट केले.
रुबिओ यांनी भारताला इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेचा प्रमुख रणनीतिक भागीदार असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. चीनचा वाढता प्रभाव लक्षात घेता संरक्षण सहकार्य, सागरी सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या संभाव्य भारत दौऱ्यात ‘क्वाड’ गटाच्या भविष्यातील सहकार्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश असलेल्या या गटामार्फत इंडो-पॅसिफिकमधील सुरक्षा, मुक्त समुद्री मार्ग आणि प्रादेशिक स्थैर्य यांसारख्या विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात.
हे ही वाचा:
आता लोकल रेल्वेच्या डब्यातून धर्मांतरणांचे रॅकेट
व्हेनेझुएलात ५० हजार लोक बेपत्ता, पुन्हा भूकंपाचे धक्के
कतारमधील रास लफ्फान दुर्घटनेतील मृत भारतीयांचे पार्थिव भारतात रवाना
भारतात ४५°C… तरी निभावतो! पण ब्रिटनमध्ये ३५°C होताच लोक हैराण; नेमकं असं का?
अमेरिकेकडून ट्रम्प यांच्या भारत भेटीबाबत सकारात्मक संकेत मिळाले असले, तरी दौऱ्याच्या तारखा किंवा अधिकृत कार्यक्रमाची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र हा दौरा झाल्यास भारत-अमेरिका संबंधांना नवी दिशा मिळण्याबरोबरच व्यापार, संरक्षण आणि जागतिक राजकारणातील दोन्ही देशांच्या भागीदारीला आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







