जमीन बळकावल्याच्या आरोपांनंतर पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार अतिन घोष आणि त्यांची मुलगी प्रियदर्शिनी घोष यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता महानगरपालिकेचे (केएमसी) माजी उपमहापौर राहिलेले अतिन घोष आणि त्यांची मुलगी यांना याच आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांच्यावर सुमारे ५० लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.
एका हॉटेल मालकाने तक्रार दाखल करत दावा केला आहे की, त्याच्या मालकीची मालमत्ता अत्यंत कमी किंमत देऊन जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आली. ही घटना प्रगती मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे सांगितले जात असले तरी नंतर तपासासाठी हे प्रकरण बिधाननगर नॉर्थ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र, अतिन घोष यांनी बुधवारी प्रतिक्रिया देताना अद्याप पोलिसांकडून कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचा दावा केला.
अतिन घोष यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत काशीपूर-बेलघरिया मतदारसंघातून विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र भाजपचे उमेदवार रितेश तिवारी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. राज्यातील सत्तांतरानंतर तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. खंडणी, भ्रष्टाचार, छेडछाड आणि इतर गंभीर आरोपांप्रकरणी अनेक टीएमसी नेते, नगरसेवक आणि आमदारांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात हॉटेल मालकाच्या तक्रारीवरून अतिन घोष आणि त्यांच्या मुलीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर जमीन बळकावणे, धमकी देणे, फसवणूक करणे, गुन्हेगारी कट रचणे यांसह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अतिन घोष यांच्यावर ईस्टर्न मेट्रोपॉलिटन बायपासलगतच्या मेट्रोपॉलिटन भागातील अडीच कट्ठे जमिनीवर उभारलेल्या तीन मजली बंगल्यावर जवळपास नऊ वर्षे बेकायदेशीर ताबा ठेवल्याचा आरोप आहे. माहितीनुसार, संबंधित जमीन आणि घराची सध्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे. मात्र तक्रारदाराचा दावा आहे की, या मालमत्तेच्या बदल्यात त्याला केवळ ५० लाख रुपये देण्यात आले होते.
हे ही वाचा:
“राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला शुभेंदू अधिकारींनी खूप मदत केली”
महापौरांच्या पाहणीदरम्यानच महानगरपालिका कर्मचारी पडला उघड्या गटारात
युक्रेनमध्ये भारतीय सैनिक? ट्रम्प यांनी प्रस्ताव फेटाळला
इराणमध्ये परिस्थिती सुधारतेय, पण सावध राहा!
दरम्यान, अतिन घोष यांची मुलगी प्रियदर्शिनी घोष यांनी माध्यमांशी बोलताना आरोप फेटाळून लावले. “माझ्या वडिलांची ५० वर्षांची राजकीय प्रतिमा कोणीही मलिन करू शकलेली नाही. आम्ही या आरोपांची जबाबदारी स्वीकारत नाही. याप्रकरणी मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे,” असे त्या म्हणाल्या. दुसरीकडे, राज्याच्या नगरविकास मंत्री अग्निमित्रा पॉल यांनी सांगितले की, “पूर्वी अशा प्रकरणांची योग्य चौकशी होत नव्हती आणि खटलेही चालवले जात नव्हते. आता तक्रार दाखल झाली असून प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.”







