पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडींमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि पक्षांतरांच्या चर्चांदरम्यान मोईत्रा यांनी अधिकारी यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांचा उल्लेख करत त्यांची जाहीरपणे प्रशंसा केली आहे.
एका मुलाखतीत महुआ मोईत्रा यांनी सांगितले की, राजकीय भूमिका आणि पक्ष वेगळे असले तरी शुभेंदू अधिकारी यांच्याशी त्यांचे भावनिक नाते आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील अनेक आठवणीही सांगितल्या. मोईत्रा यांनी २०१४ मधील एका प्रसंगाचा उल्लेख करत सांगितले की, त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तिकीट न मिळाल्याने त्या निराश झाल्या होत्या. त्या काळात मी रात्रभर रडत होते. त्यावेळी मला धीर देण्यासाठी शुभेंदू अधिकारी माझ्यासोबत उभे होते, असे त्या म्हणाल्या.
याशिवाय २०१६ मध्ये त्यांनी करीमपूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हाची आठवणही त्यांनी सांगितली. त्यावेळी पक्षातील इतर वरिष्ठ नेते प्रचारासाठी आले नव्हते, मात्र पहिली प्रचारसभा शुभेंदू अधिकारी यांनीच घेतली होती, असे मोईत्रा यांनी नमूद केले. दरम्यान, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससमोर सध्या मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले आहे. पक्षातील काही नेत्यांनी बंडखोरीचा झेंडा उचलल्याने ममता यांच्यासमोर पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा संवेदनशील काळात मोईत्रा यांनी विरोधी पक्षातील नेत्याबद्दल व्यक्त केलेल्या सकारात्मक भावना राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
मोईत्रा यांनी स्पष्ट केले की, आता त्यांचा आणि शुभेंदू अधिकारी यांचा नियमित संपर्क नसला तरी त्यांनी केलेली मदत आपण विसरू शकत नाही. राजकारणापलीकडेही काही नाती असतात, असे त्या म्हणाल्या. एका महत्त्वाच्या वक्तव्यात त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या संघटनात्मक कमकुवतपणावरही भाष्य केले. पक्षात अनेक असे नेते होते जे स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकू शकत नव्हते, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्वावर टीका केली.
हे ही वाचा:
महापौरांच्या पाहणीदरम्यानच महानगरपालिका कर्मचारी पडला उघड्या गटारात
युक्रेनमध्ये भारतीय सैनिक? ट्रम्प यांनी प्रस्ताव फेटाळला
इराणमध्ये परिस्थिती सुधारतेय, पण सावध राहा!
उत्तर प्रदेशात १०० हून अधिक कोचिंग सेंटर्स सील; खान सरांचे सेंटरही बंद
भाजपबाबत बोलताना मोईत्रा यांनी पक्षाच्या संघटनशक्तीचे कौतुक केले. भाजपकडे मजबूत कार्यकर्ते असून पक्षाची विचारधारा स्पष्ट आहे आणि पक्ष एखाद्या व्यक्तीवर अवलंबून नाही, असे त्या म्हणाल्या. तथापि, तृणमूल काँग्रेस काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याच्या चर्चांना त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले. “अशा वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही. तृणमूल काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.







