उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये जायत पोलीस ठाण्याच्या पोलिसांमध्ये आणि गो-तस्करांमध्ये सोमवारी रात्री उशिरा चकमक झाली. प्रत्युत्तरादाखल झालेल्या कारवाईत २५ हजार रुपयांचा इनामी गुन्हेगार जखमी झाला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
जायत पोलीस ठाण्याच्या पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, गोवध प्रतिबंधक कायद्याअंतर्गत वॉन्टेड असलेला एक सराईत गुन्हेगार धौरेरा जंगलाजवळ दिसून आला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करत आरोपीला पकडण्यासाठी धाड टाकली. पोलिसांनी आपल्याला घेरले असल्याचे लक्षात येताच आरोपीने पोलिसांवर गोळीबार सुरू केला.
यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यात आरोपीच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला.
जखमी आरोपीला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख हरियाणातील मेवात जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी साहून अशी झाली आहे. साहून हा आंतरराज्यीय गो-तस्करी टोळीचा सक्रिय सदस्य असून उत्तर प्रदेश आणि हरियाणातील विविध जिल्ह्यांत गुन्हे करत होता.
हे ही वाचा:
पुतिन यांच्या निवासस्थानावर ९१ ड्रोन्सचा हल्ला; ट्रम्प काय म्हणाले?
बस रिव्हर्स घेत असताना भांडूपमध्ये अपघात; चार मृत
सोन्यावरून युरोपमध्ये हाणामारी; सोने जनतेचे त्याला हात लावू नका, जॉर्जिया मेलोनी कडाडल्या
भारत २०३० पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल
पोलिसांच्या माहितीनुसार, साहूनविरुद्ध मथुरा आणि हरियाणातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत.
पोलिसांनी आरोपीकडून एक देशी कट्टा, दोन काडतुसे आणि एक चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे.
सीओ सदर संदीप सिंह यांनी सांगितले की, जखमी साहूनला पोलिसांच्या देखरेखीखाली वृंदावन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या अटकेनंतर प्रकरणाचा अधिक सखोल तपास केला जाणार आहे. साहून आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्य लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकतील.
ते पुढे म्हणाले की, साहून हा आंतरराज्यीय टोळीचा सक्रिय सदस्य असून चौकशीतून टोळीतील इतर सदस्यांनाही अटक केली जाईल. या टोळीत अनेक मोठे गुन्हेगार सामील असण्याची शक्यता आहे.
