मुंबई विमानतळावर जप्त ५ कोटींच्या सोनेप्रकरणात स्वच्छता कर्मचारी, हँडलर

डीआरआयच्या कारवाईत तस्करांसह पाच जणांना अटक

मुंबई विमानतळावर जप्त ५ कोटींच्या सोनेप्रकरणात स्वच्छता कर्मचारी, हँडलर

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने सोन्याच्या तस्करी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत तब्बल ५ कोटी ६३ लाख रुपयांची ३.८६६ किलो वजनाची मेण स्वरूपातील सोन्याची धूळ जप्त करण्यात आली असून, दुबईहून आलेला एक प्रवासी, विमानतळावरील दोन स्वच्छता कर्मचारी आणि दोन हँडलर अशा एकूण पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

२२ जुलै रोजी दुबईहून एमिरेट्सच्या ‘ईके ५०४’ विमानाने येणारा प्रवासी मोहम्मद उरवा हा विमानात तस्करीचे सोने लपवणार असल्याची आणि ते विमानतळावरील कर्मचाऱ्यांमार्फत बाहेर काढले जाणार असल्याची खात्रीशीर माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचला.

दुपारी साडेबाराच्या सुमारास उरवा विमान उतरल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर सुमारे १५ ते २० मिनिटांनी ‘एजीएच पोर्ट एव्हिएशन सर्व्हिसेस’चे स्वच्छता कर्मचारी राजेश मांजरेकर आणि झहीर कुरेशी विमानातून बाहेर पडताना दिसले. अधिकाऱ्यांनी त्यांना अडवून कस्टम कॅम्प ऑफिसमध्ये नेले असता, झहीर कुरेशीच्या पॅन्टच्या खिशातून दोन जड काळ्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. या पिशव्यांवरील काळी चिकटपट्टी काढल्यानंतर त्यामध्ये मेणाच्या स्वरूपात सोन्याची धूळ लपवून ठेवल्याचे उघडकीस आले.

हे ही वाचा:

आंदोलन हिंसक घटकांच्या ताब्यात, ११८ पोलीस जखमी, पोलिसांची २० वाहने फोडली

अमित शहांची बैठक; वांगचुकनी उपोषण घेतले मागे

शिवसेनेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरात अडीच कोटींची चोरी

नाशिकमध्ये गोदावरीला मोसमातील सर्वात मोठा पूर

शासकीय मान्यताप्राप्त मूल्यांकनकर्त्याने जप्त केलेले हे सोने २४-कॅरेटचे असून त्याचे एकूण वजन ३,८६६ ग्रॅम (निव्वळ वजन ३,७६० ग्रॅम) आणि मूल्य ५,६३,६२,४०० रुपये असल्याचे प्रमाणित केले आहे. चौकशीदरम्यान आरोपी झहीर कुरेशी याने, आपण पर्यवेक्षक राजेश मांजरेकर यांच्या सूचनेनुसार विमानातील शौचालयाच्या लपवलेल्या ठिकाणावरून हे सोने घेतल्याची कबुली दिली. तर, मांजरेकर याने आपण मोहम्मद अजहर काझी उर्फ ​​आमिर या हँडलरसाठी काम करत असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे डीआरआयने सापळा रचून अजहरला विमानतळाबाहेरच जेरबंद केले. चौकशीत त्याने हे सोने मोहम्मद अहमद उर्फ ​​मुस्तफच्या सूचनेनुसार मागवल्याचे उघड झाले. त्यानंतर मुस्तफलाही त्याच दिवशी अटक करण्यात आली.

डीआरआयच्या म्हणण्यानुसार, जर हे सोने कायदेशीर मार्गाने (बॅगेज रूपात) आयात केले असते, तर सुमारे २.४८ कोटी रुपयांचे सीमा शुल्क भरावे लागले असते. आरोपींनी मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवण्याचा हा कट रचला होता. सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या कलम १०४ आणि १३५ अन्वये पाचही जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर प्रस्तुत करण्यात आले आहे.

Exit mobile version