गुजरातच्या डिंगुचा मानवी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षकुमार पटेल उर्फ ‘डर्टी हॅरी’ याला अमेरिकेच्या प्रशासनाने शिकागोमधून अटक केली. जानेवारी २०२२मध्ये कॅनडातून अमेरिकेत बेकायदा प्रवेश करताना कुटुंबातील चार जणांचा गारठून मृत्यू झाला होता. हर्षकुमार याला शिकागो विमानतळावर ताब्यात घेण्यात आले.
सन २०२२मध्ये जगदीश पटेल (३९), वैशाली (३७), मुलगी विहांगी (११) आणि धार्मिक (३) या चौघांचा गारठून मृत्यू झाला होता. त्यामुळे अमेरिका आणि कॅनडामधील गुजराती समुदाय हादरून गेला होता. हे कुटुंब गांधीनगरजवळील दिंगुचा भागातील होते. हर्षकुमार हा स्टीव्ह शँडच्या संपर्कात होता. शँड हा गुजरातमधील सात जणांच्या बेकायदा तस्करीत सहभागी होता. त्यातील चौघांचा अमेरिकेच्या सीमेवर मृत्यू झाला. हर्षकुमार आणि शँड यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे व्हॉट्सऍप संदेश पोलिसांना सापडले आहेत. अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गुजराती नागरिकांची बेकायदा तस्करीची पाळेमुळे या पुराव्यामुळे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी कॅनडातील फेनिल पटेल आणि अमेरिकेतील बिट्टू सिंग उर्फ पाजी यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरील खटल्याची पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी आहे. हा खटला कदाचित मार्च महिन्यात मिनेसोटा येथे चालवला जाऊ शकतो.
हे ही वाचा:
दारिद्र्यपातळी लक्षणीयरीत्या ५ टक्के खाली
राष्ट्रीय लोकदलाच्या हरयाणा अध्यक्षाची गोळी झाडून हत्या!
मराठा आंदोलन: मराठवाड्यातील इंटरनेट सेवा बंद!
आधी ग्रामस्थांकडून चपलेने मार, नंतर तृणमूलचा नेता पोलिसांच्या ताब्यात!
हर्षकुमार पटेल याला परमसिंग, हरेश पटेल आणि हरेशकुमार सिंग पटेल या नावांनीही ओळखले जाते. हर्षकुमार याने शँड याला मानवी तस्करीचा मार्ग दाखवला होता, असे कागदपत्रांवरून आढळले आहे. तसेच, शँड हा हर्षकुमारच्या वतीने डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या दरम्यान घडलेल्या मानवी तस्करीत सहभागी असल्याचे आढळून आले आहे.
