प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) लोढा डेव्हलपर्स लिमिटेडचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. बुधवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील चौकशीच्या अनुषंगाने मुंबईतील राजेंद्र लोढा यांच्या विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. लोढा डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात राजेंद्र लोढा यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी ईडीने मुंबईतील त्यांच्या १४ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या छापेमारीचा उद्देश गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा मागोवा घेणे आणि संबंधित व्यवहारांशी निगडित इतर संस्थांची ओळख पटविणे हा आहे. मात्र, अद्याप कोणतीही जप्ती किंवा मालमत्तेचा तपशील समोर आलेला नाही.
लोढा डेव्हलपर्स लिमिटेड (आता मॅक्रोटेक डेव्हलपर्स) या कंपनीकडूनच राजेंद्र लोढा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यात असा आरोप करण्यात आला की, राजेंद्र लोढा यांनी २०१३ ते २०२५ या काळात आपल्या पदाचा गैरवापर करून कंपनीला सुमारे ८५ कोटी रुपयांची फसवणूक केली. कल्याणमधील भोपर गावात त्यांनी सुमारे ७.१५ लाख चौरस फूट टीडीआर अवैधरित्या विकला, ज्यामुळे कंपनीला थेट ४९ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच, त्यांनी अनधिकृत जमिनीचे व्यवहार केले, अतिशय कमी दरात भूखंड विकले आणि खोट्या अधिग्रहणांच्या नोंदी केल्या, असेही आरोप आहेत. याशिवाय, पनवेल, अंबरनाथ आणि कल्याण परिसरातील जमिनी फसवणुकीच्या माध्यमातून हस्तगत केल्या गेल्या. कंपनीच्या प्रमुख प्रकल्प ‘लोढा न्यू कफ परेड’मध्ये खोट्या बुकिंग्ज आणि रोख व्यवहारांचे दाखले दाखविण्यात आले. तपासात असे समोर आले की, राजेंद्र लोढा यांनी या सर्व व्यवहारांना वैध दाखविण्यासाठी करारपत्रे (Agreement), सामंजस्य करार (MOU) आणि इतर कागदपत्रांत बनावटपणा केला.
हेही वाचा..
दहशतवादाविरुद्ध भारताचा ठाम निर्धार
डॉक्टरांच्या अटकेनंतर अल- फलाह विद्यापीठाने सोडले मौन; काय दिले स्पष्टीकरण?
दिल्लीत येताच मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस
सेनेने दाखवली तत्परतेची अद्भुत झलक
लोढा डेव्हलपर्स कंपनीने या घडामोडींची अधिकृत पुष्टी केली आहे. राजेंद्र लोढा यांनी कंपनीच्या आदेशानंतर १७ ऑगस्ट रोजी सर्व पदांचा राजीनामा दिला होता. या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या फसवणुकीच्या प्रकरणात राजेंद्र लोढा यांना अटक केली होती. गुन्हे शाखेच्या मालमत्ता प्रकोष्ठाने त्यांच्या वर्ली येथील निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेतले.
