भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी ममता यांच्याविरोधात एफआयआर

लेखी तक्रारीच्या आधारे कारवाई

भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी ममता यांच्याविरोधात एफआयआर

तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्याविरोधात कोलकात्यातील हेअर स्ट्रीट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारसभेदरम्यान कथितरित्या भडकाऊ आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. लेखी तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस रोड परिसरातील सोवालया भागातील रहिवासी तुषार कांती दास यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी एका सभेत जनतेला भाजपच्या कथित दिशाभूल करणाऱ्या प्रचारापासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांनी नेमका कोणत्या प्रकारच्या प्रचाराचा उल्लेख केला होता, हे स्पष्ट केले नव्हते.

तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, सभेदरम्यान केलेले वक्तव्य प्रथमदर्शनी चिथावणीखोर, भडकाऊ आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवणारे असल्याचे दिसते. तक्रारदाराच्या मते, अशा प्रकारच्या विधानांमुळे विविध समुदायांमध्ये भीती, द्वेष, गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागू शकते, ज्याचा राज्यातील शांतता, सामाजिक ऐक्य आणि लोकशाही वातावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

तक्रारीत पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, निवडणुकांनंतर कोलकाता आणि पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यांत सांप्रदायिक हिंसाचाराच्या काही घटना घडल्या असून, त्या ममता बॅनर्जी यांच्या भाषणामुळे प्रभावित झाल्या असण्याची किंवा त्यांच्याशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा:

हॉर्मुझ सामुद्रधुनी जवळील १८ हजार भारतीय खलाशांना हाय अलर्ट

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास इराणची तयारी

केईएम रुग्णालय करणार डॉ. सेजल पवारची चौकशी, केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

NEET च्या उमेदवारांना मिळणार अतिरिक्त १५ मिनिटे

तुषार कांती दास यांनी संबंधित सभेची व्हिडिओ क्लिप पेन ड्राइव्हमध्ये पोलीसांकडे सुपूर्द केली आहे. त्यांनी पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, व्हिडिओ आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी करावी, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तक्रारदाराने असेही म्हटले आहे की, जर अशी विधाने निवडणूक प्रचारादरम्यान करण्यात आली असतील, तर त्यांची चौकशी निवडणूक नियम आणि आदर्श आचारसंहितेच्या तरतुदींनुसारही केली जावी.

Exit mobile version