तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान परदेशी नागरिकांनी बेकायदेशीररीत्या मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेन्नई पोलिसांनी १० परदेशी नागरिकांना अटक केली असून त्यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे. या सर्वांनी बनावट ओळखपत्रांच्या आधारे मतदान केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले होते. मतदानानंतर हे परदेशी नागरिक देशाबाहेर जाण्याच्या तयारीत होते. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान त्यांच्या बोटांवरील मतदानाची शाई पाहिली. त्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांची चौकशी करण्यात आली.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच देशांच्या दौऱ्यावर
मुंबई, दिल्ली, गुरूग्रामनंतर बंगळुरूमध्ये टेस्लाचे ‘एक्स्पिरियन्स सेंटर’
पेट्रोल-डिझेलच्या दरात ३ रुपयांनी वाढ; तर सीएनजी २ रुपयांनी महागले
शी जिनपिंग म्हणाले, अमेरिका अधोगतीकडे चालली
चौकशीत समोर आले की, संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक नसून त्यांच्याकडे परदेशी नागरिकत्व आहे. तरीही त्यांनी तामिळनाडूतील विविध भागांत राहून मतदानाचा हक्क बजावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, या लोकांनी खोटी कागदपत्रे तयार करून मतदार यादीत नाव नोंदवले होते.
या प्रकरणाची माहिती इमिग्रेशन विभागाने ग्रेटर चेन्नई पोलिसांकडे दिल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. ७ मे ते १४ मेदरम्यान सेंट्रल क्राइम ब्रांच आणि स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, काही माध्यमांच्या वृत्तानुसार चेन्नई आणि मदुराई विमानतळांवर मिळून अशा प्रकारातील आणखी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मतदानाची शाई पाहून अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता हे लोक परदेशी पासपोर्टधारक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेच्या गैरवापराबाबत चौकशी वाढवण्यात आली आहे.
या घटनेमुळे निवडणूक व्यवस्थेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मतदार यादीत परदेशी नागरिकांची नावे कशी आली, बनावट कागदपत्रे कोणी तयार केली आणि त्यांना मतदानासाठी मदत कोणी केली, याचा शोध घेण्याचे काम पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत यंदा मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते. अशा परिस्थितीत बेकायदेशीर मतदानाचा प्रकार उघड झाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत दिले असून, दोषींवर कायद्यानुसार कठोर शिक्षा होऊ शकते.
