लोढा डेव्हलपर्स लिमिटेड या प्रसिद्ध बांधकाम कंपनीला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कंपनीचेच माजी संचालक राजेंद्र लोढा यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत इतर साथीदारांच्या मदतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ८५ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, राजेंद्र लोढा हे ‘सुसाईड बॉम्बर’ बनून कंपनीची बदनामी करू शकतात, अशी धमकी एका आरोपीने दिल्याचेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी राजेंद्र लोढा यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
१९९० पासून लोढा डेव्हलपर्सशी संबंधित असलेले आणि सप्टेंबर २०१३ पासून १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत संचालकपदी राहिलेले राजेंद्र लोढा यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. कंपनीने त्यांना केवळ जमीन संपादनाचे अधिकार दिले होते, विक्रीचे कोणतेही अधिकार नव्हते. तरीही, त्यांनी मुलगा साहिल लोढा, तसेच उषा प्रॉपर्टीजचे भरत नरसाना, नितिन वडोर, रितेश नरसाना यांच्यासोबत संगनमत करून कंपनीच्या मालकीची जमीन आणि टीडीआर कमी दरात विकल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
जमीन ताब्यात नसतानाही ती असल्याचे भासवून खरेदीदारांकडून फ्लॅट आणि पैशांची वसुली केल्याचेही एफआयआरमध्ये म्हटले आहे. या गैरव्यवहारात आरोपींना मोठा आर्थिक फायदा झाला, तर कंपनीला ८५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या घोटाळ्यात काही अंतर्गत कर्मचारी – निशा मेनन, नेहा देसाई, अमित कांबळे आणि विक्रेते सुजितकुमार जीतप्रताप सिंग व विनोद पाटील यांनीही मदत केल्याचे समोर आले आहे.
हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कंपनीने राजेंद्र लोढा यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता आढळल्याने त्यांची चौकशी सुरू केली. मात्र, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. याचदरम्यान, एका आरोपीने कंपनीचे मुख्य संचालक अभिषेक लोढा यांना धमकी दिली की राजेंद्र लोढा हे ‘सुसाईड बॉम्बर’ असून ते स्वतःचे आणि कंपनीचे नुकसान करून बदनामी करू शकतात.
हे ही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजा चार्ल्स यांच्याकडून वाढदिवसाची ‘ही’ खास भेट!
साबरमती नदीकाठच्या ७०० हून अधिक अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर कारवाई
पाक-सौदी संरक्षण करारावर भारताची नजर
दिशा पटानी गोळीबार: हल्लेखोरांकडे सापडले पाकिस्तानी ड्रोनद्वारे तस्करी केलेले तुर्की पिस्तूल
लोढा डेव्हलपर्स लिमिटेडच्या हेड लायझर मोनिल गाला यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेंद्र लोढा, साहिल लोढा, भरत नरसाना, नितिन वडोर, रितेश नरसाना यांच्यासह १० जणांवर फसवणूक, विश्वासघात आणि बनावट कागदपत्रांचा वापर केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाकडे सोपवण्यात आला असून, त्यांनी राजेंद्र लोढा यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र लोढा हे भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे दूरचे नातेवाईक असल्याचेही समोर आले आहे.
