‘मराठी’मुळे मिळाली अपहरण झालेली ४ वर्षांची चिमुरडी!

पत्रकाराने दिलेल्या माहितीवरून लागला सुगावा

‘मराठी’मुळे मिळाली अपहरण झालेली ४ वर्षांची चिमुरडी!

सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अपहरण झालेली ४ वर्षांची चिमुरडी अखेर सापडली आहे. विशेष म्हणजे, केवळ ‘मराठी’ भाषेमुळे ती वाराणसीच्या एका बालसुधारगृहात मुंबई पोलिसांना मिळून आली. ‘ऑपरेशन शोध’ या विशेष मोहिमेदरम्यान वाराणसीतील एका स्थानिक हिंदी पत्रकाराने दिलेल्या माहितीमुळे हे शक्य झाले.

सोलापूरहून उपचारासाठी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेल्या एका कुटुंबातील ही ४ वर्षांची मुलगी २० मे रोजी रेल्वे परिसरातून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता.
परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे आणि एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जणांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही तपासले असता एका व्यक्तीने मुलीचे अपहरण करून लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस येथून उत्तर प्रदेशात जाणाऱ्या ट्रेनने पलायन केल्याचे दिसून आले.

हे ही वाचा:

लालू यादव यांच्या कन्येचा राजकीय संन्यास

दृष्टिबाधित महिला टी-२० विश्वकप : भारताची मोठ्या दिमाखात सेमिफायनल गाठली

ऋषभ पंतचा नवा विक्रम!

गाझीपूरमध्ये या शेतकऱ्यांना झाला लाभ

भुसावळ, मध्य प्रदेश, वाराणसीपर्यंत पाठलाग!

पोलीस पथकाने अपहरणकर्त्याचा माग काढत भुसावळ, मध्य प्रदेश आणि वाराणसीपर्यंत धाव घेतली. १० दिवस वाराणसीत मुक्काम करूनही आरोपीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान ‘ऑपरेशन शोध’ ही मोहीम राबवली. या मोहिम अंतर्गत, पथकाने मुलीचे छायाचित्र वाराणसीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात दिले, तसेच स्थानिक वृत्तपत्रांमध्येही अपहरणाची माहिती प्रसिद्ध केली. याच प्रयत्नांना यश आले.

मराठी भाषेमुळे लागला ठावठिकाणा

वृत्तपत्रातील बातमी वाचून एका स्थानिक हिंदी पत्रकाराने तपास पथकाला महत्त्वाची माहिती दिली. त्याने सांगितले की, वाराणसीतील एका बालसुधारगृहात मराठी बोलणारी एक मुलगी दाखल आहे.मुंबई पोलिसांचे पथक तात्काळ बालसुधारगृहात पोहोचले आणि त्यांनी मुलीची ओळख पटवली. ती मुंबईतून अपहरण झालेली मुलगी असल्याची खात्री डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. मुलीला ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले असून तिला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान, मुलीच्या अपहरणकर्त्याचा शोध अद्याप सुरू आहे.

Exit mobile version