मुंबईतील एका ७३ वर्षीय बहुराष्ट्रीय कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि सध्या खाण उद्योग सल्लागार म्हणून काम करणाऱ्या गृहस्थांची लाखोंची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. दादर पूर्वेतील ७३ वर्षीय रहिवाशाने दाखल केलेल्या तक्रारीवरून आरएके मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दहशतवादी गटाशी संबंध असल्याचे भासवून त्यांना डिजिटल अटक करण्यात आली. या प्रकरणात त्यांची ७० लाख रुपयांची फसवणूक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार गेल्या आठवड्यात सुरू झाला. तक्रारदार गृहस्थांना गुरुवारी एका अज्ञात महिलेचे फोन येऊ लागले, जिने स्वतःची ओळख नवी दिल्लीतील दहशतवाद विरोधी (एटीएस) नियंत्रण पथकातील आयपीएस अधिकारी विनीता शर्मा अशी करून दिली. त्यानंतर तिने ज्येष्ठ नागरिकाला सांगितले की ते पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एका संवेदनशील प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांनी या प्रकरणात आधीच अनेक व्यापारी, राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकले आहेत. तसेच पुढे त्या महिलेने त्यांना सांगितले की, हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित केले जात आहे.
पुढे तक्रारदाराला एका व्यक्तीचे फोन येऊ लागले, जो स्वतःला एनआयए अधिकारी म्हणून भासवत होता आणि स्वतःला आयपीएस अधिकारी प्रेमकुमार गौतम म्हणून सांगत होता. व्हिडिओ कॉलमध्ये तक्रारदाराने पाहिले की, समोरील व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात बसून आहे आणि मनी लाँड्रिंग, दहशतवाद निधीसाठी वापरल्या जाणाऱ्या तक्रारदाराशी संबंधित कागदपत्रे सापडल्याच्या छाप्यांबद्दल बोलत असल्याचे पाहिले. त्याने अटक वॉरंट देखील दाखवले आणि तपासकर्त्यांना सहकार्य करण्यास सांगितले.
हे ही वाचा :
लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड
बरेली हिंसाचार: मुख्य कट रचणाऱ्यांपैकी एक नदीम खान पोलिसांच्या ताब्यात!
लेहमधील अशांततेचा लडाख पर्यटनाला फटका!
बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा: परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ!
शुक्रवारी, गृहस्थांना राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते असल्याचे भासवणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. त्यांनी तक्रारदाराला सांगितले की त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला दाखल होणार आहे आणि त्यांच्या सर्व गुंतवणुकींबद्दल विचारणा केली. तक्रारदाराने त्यांना त्यांच्या मुदत ठेवी, बचत बँक खाती, शेअर बाजार आणि परदेशी बँक खात्यांची संपूर्ण यादी दिली. त्यांना सांगण्यात आले की, त्यांचे सर्व निधी कायदेशीर करणे आवश्यक आहे; यासाठी त्यांनी त्यांना पैसे द्यावेत. पडताळणीनंतर ते पैसे परत करतील, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने आरोपीने दिलेल्या बँक खात्यात ७० लाख रुपये पाठवले. या पैशांची पावतीही देण्यात आली. पुढे वारंवार पैशांची मागणी केल्यामुळे तक्रारदाराला काहीतरी संशयास्पद वाटले आणि त्याने आरएके मार्ग पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.
