१० हजार सिमकार्डद्वारे सायबर ठगी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

उत्तर प्रदेश एसटीएफची मुंबईत मोठी कारवाई

१० हजार सिमकार्डद्वारे सायबर ठगी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई गुन्हे शाखेचे गुन्हे गुप्तवार्ता पथक (CIU) आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कार्य दलाने (STF) दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात एक संयुक्त मोहीम राबवून एका कुख्यात सायबर गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. शिहान इश्तियाक शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. यूपी एसटीएफने त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शिहान शेख कुलाबा येथील एका ट्रॅव्हल्स कंपनीत नाव बदलून काम करत होता. गुप्त माहितीच्या आधारे सीआययू आणि यूपी एसटीएफने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. गुरुवारी न्यायालयाने त्याची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन लखनौकडे रवाना झाले आहे.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिहान हा उत्तर प्रदेशातील एका मोठ्या सायबर फसवणुक टोळीचा सक्रिय सदस्य आहे. तो मुंबईतून मोठ्या प्रमाणात सिमकार्ड खरेदी करून उत्तर प्रदेशात नेत असे. तिथे आपल्या गावातील साथीदारांना तो ही सिमकार्ड १,००० ते १,२०० रुपयांना विकत असे. धक्कादायक म्हणजे, ही सिमकार्ड सक्रिय करण्यासाठी बनावट आधार कार्डांचा वापर केला जात होता. यात दूरसंचार कंपन्यांच्या काही अधिकाऱ्यांचेही संगनमत असल्याचे उघड झाले आहे.

टोळी सक्रिय झालेले सिमकार्ड थेट कंबोडियात बसलेल्या सायबर माफियांना पुरवत असे. या बदल्यात त्यांना मोठी रक्कम मिळत असे. या सिमकार्डचा वापर करून भारतात ‘डिजिटल अरेस्ट’, ‘स्टॉक मार्केट फ्रॉड’ आणि ‘पार्सल स्कॅम’ यांसारखे गुन्हे केले जात होते. गेल्या तीन वर्षांत या टोळीने तब्बल १०,००० सिमकार्ड सक्रिय करून सायबर गुन्हेगारांना पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा..

पंतप्रधान मोदी यांची भारतीय एआय स्टार्टअप्ससोबत चर्चा

वाचकसंख्या कमी असूनही जाहिरात निधीसाठी कर्नाटकात नॅशनल हेराल्ड अव्वल

मादुरो यांच्या अटकेनंतर अमेरिकन सेनेने दोन टँकर ताब्यात घेतले

काँग्रेस संपवण्याची जबाबदारी राहुल गांधी उचलताहेत

या प्रकरणात यापूर्वीच टोळीचा म्होरक्या ओमप्रकाश अग्रहरी, व्होडाफोन-आयडियाचे सेल्स एक्झिक्युटिव्ह शिवदयाल निषाद, जितेंद्र कुमार आणि वकील राहुल पांडे यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे. ओमप्रकाशने डिस्ट्रीब्यूटरशिप संपल्यानंतर बनावट पीओएस (POS) एजंट तयार केले होते. ग्राहकांना एक सिम देऊन त्यांच्या नावावर दुसरे सिम स्वतःकडे ठेवून ते कंबोडियाला पाठवले जात असे. चित्रकूटमधील राजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्रथम गुन्हा दाखल झाला होता, ज्याचा तपास आता एसटीएफ करत आहे. शिहानच्या अटकेनंतर या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटमधील आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version