वयोवृद्ध नागरिकांना लुबाडणारी ‘बोलबच्चन’ टोळी जेरबंद; १३ गुन्हे उघड

साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई

वयोवृद्ध नागरिकांना लुबाडणारी ‘बोलबच्चन’ टोळी जेरबंद; १३ गुन्हे उघड

मुंबईतील साकीनाका पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मुंबई आणि नवी मुंबईतील एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून १५,४६,२५० रुपये किमतीचे १२३.७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

ही टोळी प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना आपले लक्ष्य बनवत असे. “आमच्या शेठला मुलगा झाला आहे,” “साड्यांचे मोफत वाटप सुरू आहे” किंवा “रेशन वाटप सुरू आहे” असे आमिष दाखवून ते नागरिकांना गाठत. समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन केल्यानंतर, “तुम्ही गरीब दिसण्यासाठी तुमच्या अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा” असे सांगून नजरचुकीने त्यांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली जात असे.

२४ मार्च रोजी साकीनाका येथील मोहीली व्हीलेज परिसरात एका व्यक्तीची २,०५,००० रुपयांना फसवणूक झाली होती. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. साकीनाका गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नागरे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास चक्रावून पहिल्या आरोपीला डोंबिवली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर दोन आरोपींना शिर्डी (जिल्हा अहिल्यानगर) येथून अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

मोदींच्या सहीचे बनावट पत्र करून खंडणी उकळणारे वरळीत जेरबंद

गॅस सिलेंडर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४५ सिलेंडर आणि ३ दुचाकी जप्त

अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी १० ठिकाणी छापे

कर्णधार दमदार; लखनऊ सुपर जायंट्सचा हैदराबादवर मोठा विजय

संतोष गंगाराम चौरे (वय ५५) याच्यावर यापूर्वी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत २६ गुन्हे दाखल आहेत, बालाजी रोहिदास पवार (वय २५): याच्यावर ३ गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मण रोहिदास पवार (वय २२): याच्यावर ३ गुन्हे दाखल आहेत.

उघडकीस आलेले गुन्हे 

आरोपींच्या अटकेनंतर साकीनाका, घाटकोपर, भायखळा, एन एम जोशी मार्ग, दिंडोशी, जुहू, श्रीनगर आणि सानपाडा यांसारख्या विविध भागांतील १३ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
सदर कामगिरी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण आणि अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील यादव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Exit mobile version