घाटकोपरच्या लक्ष्मीनगर परिसरात कौटुंबिक वादातून ३५ वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी मृत महिलेची सासू, तिची मोलकरीण, मोलकरणीची मुलगी, पती आणि मुलगा अशा पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात हत्येचा कट आधीच रचण्यात आल्याचे समोर आले आहे.
सपना प्रमोद गंजी (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. ती घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मीनगर परिसरातील त्रिवेणी इमारतीत राहत होती. १६ ऑगस्टच्या रात्री ती घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. उपचारासाठी तिला प्रथम सुप्रीम हॉस्पिटल आणि त्यानंतर राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी रात्री १२.४१ वाजता तिला मृत घोषित केले.
दरम्यान, राजावाडी रुग्णालयात मृतदेहाची पाहणी करताना पोलिसांना महिलेच्या गळ्याभोवती काळे-निळे व्रण तसेच डोक्याच्या डाव्या बाजूला रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत पोलिसांना संशय आला. पंतनगर पोलिसांनी मृत महिलेची सासू धनलक्ष्मी गंजी हिची चौकशी केली असता तिने सपना हिच्याशी भांडण झाल्यानंतर तिला ढकलल्याने ती बाथरूममध्ये पडली आणि डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
अमेरिकेवर कर्जाचा डोंगर! इतिहासात प्रथमच कर्ज ४० ट्रिलियन डॉलरपार
होर्मुझमधून तेल नेण्यासाठी अमेरिकेने उघडला ‘गुप्त मार्ग’?
पाकला ‘जशास तसं’ दणका; उच्चायोगाबाहेरील बॅरिकेड्स हटवले
दिपके..आंदोलन असं करायचं असतं!
मात्र, पोलिसांच्या तपासात वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली. धनलक्ष्मी गंजी हिने मोलकरीण मंगला जाधव, तिची मुलगी शिवानी, पती सुरेश आणि मुलगा राजन यांच्यासोबत मिळून सपनाच्या हत्येचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. सपनाने यापूर्वी सासरच्या मंडळीविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच घरगुती हिंसाचार कायद्यानुसारही तक्रार केली होती. या कारणावरून तिच्या सासूच्या मनात सपनाबाबत राग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, जून २०२६ मध्ये सपना दुबईहून मुलासह मुंबईत आली होती. त्यानंतर सुमारे महिनाभरापूर्वी तिची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. यासाठी मोलकरीण मंगला जाधव आणि तिच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये देण्याचे ठरवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
१६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सपना घरात एकटी असताना आरोपी एकामागोमाग घरात दाखल झाले. त्यावेळी सपना दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या डोक्यात काचेचा ग्लास मारण्यात आला. त्यानंतर तिच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून ओढणीने गळा आवळण्यात आला. एवढ्यावर न थांबता आरोपी क्रमांक चार आणि पाच यांनी तिच्या गळ्यावर पाय ठेवून तिला जिवे मारल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सपनाचे वडील राजेंद्र वल्लाळ यांच्या तक्रारीवरून पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सासू धनलक्ष्मी गंजी हिला १७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मंगला जाधव (४५), शिवानी जाधव (२१), सुरेश जाधव (४६) आणि राजन जाधव (१९) या चार आरोपींना १८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पंतनगर पोलिसांनी घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या चौकशीतून हत्येचा उलगडा केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
