‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून निवृत्त आयकर अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा

एकाला बेड्या

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून निवृत्त आयकर अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा

मनी लाँडरिंगच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून दहिसरमधील एका ७५ वर्षीय निवृत्त आयकर अधिकाऱ्याची तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने मोहम्मद सफवान अब्दुल हमीद नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून कॉल

तक्रारदार हे २०१० मध्ये आयकर विभागातून निवृत्त झाले असून ते दहिसर येथे राहतात. जानेवारी २०२६ मध्ये त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. कॉलरने पोलिसांचा गणवेश परिधान केला होता आणि स्वतःची ओळख लखनौ पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी ‘प्रेमकुमार गौतम’ अशी करून दिली. लखनौमधील एका खासगी बँकेत तक्रारदाराच्या नावाने खाते उघडण्यात आले असून त्यातून मनी लाँडरिंगचे कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचा बनाव या भामट्याने रचला. तक्रारदाराने असा कोणताही प्रकार केला नसल्याचे सांगूनही आरोपींनी त्यांच्यावर दबाव आणला.

यानंतर स्वतःला पोलीस निरीक्षक विजय खन्ना आणि पोलीस महासंचालक (DGP) राकेश अग्रवाल सांगणाऱ्या अन्य दोन भामट्यांनी व्हिडिओ कॉल करून ज्येष्ठ नागरिकावर १० वर्षे तुरुंगवासाची कारवाई करण्याची धमकी दिली. चौकशी पूर्ण होईपर्यंत सतत व्हिडिओ कॉलवर राहण्याचे आणि ‘डिजिटल हाउस अरेस्ट’मध्ये राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले. तसेच, ही बाब कोणालाही सांगितल्यास तात्काळ घरी येऊन अटक करू, अशी धमकीही दिली.

हे ही वाचा:

डुप्लिकेट चावीने महागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

होर्मुझमधून तेल नेण्यासाठी अमेरिकेने उघडला ‘गुप्त मार्ग’?

पाकला ‘जशास तसं’ दणका; उच्चायोगाबाहेरील बॅरिकेड्स हटवले

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ‘आयपीओ’ला सेबीचा ग्रीन सिग्नल!

‘सुरक्षित’ खात्याच्या नावाखाली ५१ लाख उकळले

घाबरलेल्या तक्रारदाराला बनावट सरकारी कागदपत्रे पाठवून त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेण्यात आली. चौकशी संपेपर्यंत सर्व ठेवी व बचत एका ‘सुरक्षित’ सरकारी खात्यात वर्ग करण्यास भाग पाडले. त्यानुसार तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने ५१ लाख रुपये आरोपींच्या खात्यात पाठवले. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली.
तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मोहम्मद सफवान अब्दुल हमीद याला ताब्यात घेतले. मुख्य सायबर भामट्यांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरवणे आणि त्या बदल्यात कमिशन मिळवणे असे काम हा आरोपी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून या रॅकेटमधील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Exit mobile version