मुंबईतील कांदिवली परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट दागिने बनवणाऱ्या एका युनिटमधून १३ बाल कामगारांची सुटका केली आहे. बालमजुरी विरोधातील कारवाईअंतर्गत कांदिवली पश्चिम येथील बनावट दागिने तयार करणाऱ्या युनिटवर छापा टाकण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी गुरुवारी (२० ऑगस्ट) दिली.
सुटका करण्यात आलेल्या मुलांचे वय १३ ते १७ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी चारकोप इंडस्ट्रियल इस्टेटमधील ‘जहारा फॅशन एरा’ नावाच्या युनिटवर ही कारवाई केली. प्राथमिक तपासानुसार, बनावट दागिने आणि बांगड्या तयार करण्यासाठी या मुलांना कामावर ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, या मुलांकडून दररोज नऊ ते दहा तास काम करून घेतले जात होते. त्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याचाही आरोप आहे. सुटका करण्यात आलेली सर्व १३ मुले पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
छापेमारीदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ही मुले ज्या ठिकाणी काम करत होती, तिथेच राहत होती. युनिटचा मालक आणि ऑपरेटर मुलांचे वय सिद्ध करणारी योग्य कागदपत्रेही सादर करू शकले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी युनिटचा मालक अंकित कुमार महेंद्र रावल आणि ऑपरेटर समीनुर मोतियार रहमान शेख यांना ताब्यात घेतले आहे. दोघांविरोधात बाल आणि किशोर कामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा तसेच किशोर न्याय कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसचे तुष्टीकरणाचं राजकारण आता चालणार नाही!
चिनाब ब्रिजवर वंदे भारत सुसाट; गाठला १०० किमी प्रतितासाचा वेग!
कॅन्सर mRNA थेरपी ठरली गेमचेंजर! मॉडर्नाच्या शेअर्समध्ये १७७ टक्क्यांची झेप
दारू घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी कोषाध्यक्षांच्या घरावर ईडीची धाड
सुटका करण्यात आलेल्या सर्व अल्पवयीन मुलांना पुढील काळजी आणि आवश्यक कारवाईसाठी संबंधित विभागाकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, ही मुले पश्चिम बंगालमधून मुंबईत कोण घेऊन आले? तसेच या प्रकरणामागे बालमजुरीशी संबंधित कोणते मोठे रॅकेट किंवा नेटवर्क कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
