चर्चगेट-बोरिवली लोकलच्या दिव्यांगांसाठी राखीव डब्यात जागेवरून झालेल्या वादातून एका प्रवाशाला धावत्या लोकलमधून धक्का देण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी माहिम-बांद्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ६२ वर्षीय दिव्यांग प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी ४८ वर्षीय अमजद सफरुद्दीन शेख याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी सुमारे १.२२ वाजता चर्चगेटहून बोरिवलीकडे जाणारी लोकल माहिम-बांद्रा स्थानकांदरम्यान किलोमीटर क्रमांक १४/०३ परिसरातून जात असताना दिव्यांगांसाठी राखीव डब्यात दोन प्रवाशांमध्ये आसनावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. यावेळी अमजद शेख याने दिव्यांग प्रवासी केजितान पाल डेनिस पिरिस (वय ६२, रा. सांताक्रुझ पूर्व) यांना धक्का दिल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
लखनऊमध्ये कौटुंबिक वादाचा थरारक शेवट
गुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू, २५ जणांची प्रकृती गंभीर
कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ…
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर FDAचा कडक बडगा
धावत्या लोकलमधून खाली पडल्याने पिरिस गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी सुमारे २.४५ वाजता त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असताना त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी संशयित आरोपी अमजद शेख याला ताब्यात घेतले. याप्रकरणी वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
राखीव डब्यांतील अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न
दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यात अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे यापूर्वीही वाद आणि गैरसोयीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनेत वादाचे थेट रूपांतर प्रवाशाच्या मृत्यूत झाल्याने रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिव्यांग कार्यकर्ते आणि ९० टक्के दिव्यांग असलेले
समीर झवेरी यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दिव्यांगांसाठी राखीव डब्यांमध्ये सक्षम प्रवाशांचा अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, नियम मोडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी आणि दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
